Nagar : निंबळक, विळद येथील रेल्वे उड्डाणपुलास मंजुरी

पारनेर : छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर-पुणे या रेल्वेमार्गासंदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांसमवेत खा. नीलेश लंके यांची अहिल्यानगर येथे बैठक पार पडली. खा. लंके यांनी यापूर्वी मागणी केलेल्या निंबळक व विळद येथील रेल्वे उड्डाणपुलास रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिल्याची माहिती खा. लंके यांनी पत्रकारांना दिली.
दळवणवळण सुलभ होऊन जिल्ह्याच्या सर्वांगिण विकास व्हावा, यासाठी खा. लंके यांनी छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर-पुणे असा रेल्वेमार्ग सुरू करण्याची मागणी खा. लंके यांनी रेल्वे मंत्रालयाकडे केली असून त्यासंदर्भात दिल्ली येथे त्यांचा पाठपुरावा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत अहिल्यानगर येथे महत्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी संभाजीनगर ते पुणे रेल्वेमार्गाबरोबरच नगर-पुणे इंटरसिटी सेवा, निंबळक, विळद येथील मंजूर उड्डाणपुलाच्या कामासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
खा. लंके यांनी सांगितले की, संभाजीनगर-अहिल्यानगर-पुणे या रेल्वे मार्गासंदर्भात आपण संसदेत मागणी केली होती. या मागणीचा आपण रेल्वे मंत्रालयाकडेही पाठपुरावा करत आहोत. प्रस्तावित केलेल्या रेल्वे मार्गावर श्री.क्षेत्र देवगड, श्री. क्षेत्र शनिशिंगणापुर, रांजणगाव गणपती या प्रसिध्द तीर्थस्थळांबरोबरच वाळुंज, नगर, सुपा-पारनेर, रांजणगाव या औद्योगिक क्षेत्रांचा समावेश आहे. हा मार्ग झाल्यानंतर तीर्थक्षेत्रांना भेटी देणाऱ्या भाविकांबरोबरच औद्योगिक वसाहतीमध्ये तयार होणारी उत्पादने तसेच या उद्योगांना लागणारा कच्चा माल याच्या वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
संभाजीनगर-अहिल्यानगर मार्गाचे सर्वेक्षण
खा. नीलेश लंके यांची माहिती, नगर-पुणे रेल्वेमार्गासंदर्भात बैठक
खा. लंके यांनी सांगितले की आपण केलेल्या मागणीनुसार तसेच रेल्वे मंत्रालयाकडे केलल्या पाठपुराव्यानंतर छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर या ८० किलोमीटर रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून या कामास लवकरच सुरूवात होणार असल्याचे ते म्हणाले.
इंटरसिटी सेवेच्या मागणीस प्रतिसाद
नगर ते पुणे या मार्गावर जिल्ह्यातील अनेक नागरीक दररोज प्रवास करतात. नोकरदार, विद्यार्थी, व्यापारी वर्गाला पुण्यात पोहचण्यासाठी तसेच पुण्याहून नगरकडे पोहचण्यासाठी वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागतो. या प्रवाशांच्या सोईसाठी नगर-पुणे ही इंटरसिटी रेल्वे सेवा ट्रायल ॲण्ड रन बेसिसवर सुरू करण्याची मागणी करण्यात आली. या मागणीस सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, ही सेवा लवकरच सुरू होईल, असा विश्वास खा. लंके यांनी व्यक्त केला.





