Pune District : सोमेश्वर कारखान्याची रणधुमाळी थंडावली
Pune District : निवडणुकीत तीन प्रमुख पॅनल आमनेसामने आल्याने चुरस वाढली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलसमोर कारखान्यावरील वर्चस्व कायम राखण्याचे आव्हान आहे.

बारामती : बारामती तालुक्यासह पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराची सांगता झाली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनल, विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांचे स्वतंत्र पॅनल आणि युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलच्या सांगता सभा पार पडल्या. आरोप – प्रत्यारोप, शक्तिप्रदर्शन आणि सभासदांना विजयाचे आवाहन करीत प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत.
संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी ८३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. २७ हजार ६२४ ते २७ हजार ७०० सभासद मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. रविवारी (दि.११) सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार असून, सोमवारी (दि. १२) मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.
निवडणुकीत तीन प्रमुख पॅनल आमनेसामने आल्याने चुरस वाढली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलसमोर कारखान्यावरील वर्चस्व कायम राखण्याचे आव्हान आहे. दुसरीकडे, पुरुषोत्तम जगताप यांनी स्वतंत्र पॅनल उभे केल्याने निवडणुकीत वेगळे राजकीय समीकरण निर्माण झाले आहे. युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलनेही सभासदांच्या मतांवर लक्ष केंद्रित केले आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर होत असलेली ही निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. उमेदवारीवरून निर्माण झालेली नाराजी, स्वतंत्र पॅनलची उभारणी, प्रचारादरम्यान झालेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे निवडणुकीची रंगत वाढली. आता प्रचार संपल्यानंतर प्रत्यक्ष मतदानातून सभासद कोणाच्या बाजूने कौल देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निवडणूक एका नजरेत
एकूण जागा : २१
अंतिम रिंगणातील उमेदवार : ८३
मतदार : २७ हजार ६२४ ते २७ हजार ७००
मतदान : रविवार, ११ ऑक्टोबर २०२६
मतदानाची वेळ : सकाळी ८ ते दुपारी ४
मतमोजणी : सोमवार, १२ ऑक्टोबर २०२६





