Pune District : जुन्नर तालुक्यात नवे समीकरण?
Pune District : आमदार सोनवणे हे संजय काळे यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दोघांमध्ये लढत झाल्यास जिल्हा बँकेच्या निवडणुकीला जुन्नर तालुक्यातील सहकारासोबतच स्थानिक राजकारणाचीही किनार मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

आळेफाटा : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुन्नर तालुक्यात राजकीय चर्चांना वेग आला आहे. विद्यमान संचालक संजय काळे यांच्या विरोधात कोण उमेदवारी करणार, याबाबत उत्सुकता असतानाच नारायणगाव सहकारी सोसायटीने आमदार शरद सोनवणे यांच्या उमेदवारीसाठी ठराव केल्याने संभाव्य लढतीची चर्चा सुरू झाली आहे.
आमदार सोनवणे हे संजय काळे यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दोघांमध्ये लढत झाल्यास जिल्हा बँकेच्या निवडणुकीला जुन्नर तालुक्यातील सहकारासोबतच स्थानिक राजकारणाचीही किनार मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, अद्याप संभाव्य लढतीचे चित्र स्पष्ट झालेले नाही. या निवडणुकीत मतदारांची जुळवाजुळव, सहकारी संस्थांमधील पाठबळ आणि स्थानिक नेत्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि पिंपळवंडी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष रघुनाथ लेंडे यांच्या भूमिकेकडेही लक्ष लागले आहे.
संजय काळे आणि लेंडे यांच्यातील राजकीय संबंधांबाबत विविध चर्चा सुरू असल्या, तरी दोघेही एकाच पक्षाशी संबंधित असल्याने आगामी काळात कोणती भूमिका घेतली जाते, हे महत्त्वाचे ठरणार आहे. लेंडे यांना ओबीसी गटातून उमेदवारी मिळाल्यास किंवा ते स्वतः निवडणूक लढविण्यास उतरल्यास राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
दिवंगत आशाताई बुचके यांना मानणार्या मतदारांची भूमिका या निवडणुकीत महत्त्वाची ठरू शकते, अशीही चर्चा आहे. त्यामुळे या मतदारांचे पाठबळ कोणाला मिळते, याकडे लक्ष राहणार आहे. दुसरीकडे, सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर आणि माजी आमदार अतुल बेनके यांची भूमिका काय राहणार, याबाबतही उत्सुकता आहे. हे नेते संजय काळे यांना पाठिंबा देतात की अन्य राजकीय समीकरणे आकाराला येतात, यावर निवडणुकीतील गटांची जुळवाजुळव अवलंबून राहू शकते.
मतांचे गणित आणि भूमिका
नारायणगाव सोसायटीचा आमदार शरद सोनवणे यांच्या उमेदवारीसाठीचा ठराव आणि संजय काळे यांच्यासमोर संभाव्य आव्हान उभे राहण्याची चर्चा यामुळे जुन्नर तालुक्यातील जिल्हा बँकेच्या निवडणुकीकडे लक्ष वेधले गेले आहे. उमेदवारीबाबतचे निर्णय, सहकारी संस्थांमधील मतांचे गणित आणि स्थानिक नेत्यांच्या भूमिका स्पष्ट झाल्यानंतरच निवडणुकीतील राजकीय समीकरणांचे चित्र स्पष्ट होणार आहे.





