Pune District : धामणीतील उपसा सिंचन प्रश्न सोडविण्यासाठी लक्ष घालणार
Pune District : धामणी परिसर हा जिरायती भाग म्हणून ओळखला जातो. येथील शेती प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने शेतकर्यांनी एकत्र येत नऊ सामूहिक उपसा सिंचन योजना उभारल्या.

पारगाव-शिंगवे : आंबेगाव तालुक्यातील धामणी येथील शेतकर्यांनी स्वखर्चाने उभारलेल्या नऊ सामूहिक उपसा सिंचन योजना वीज जोडणीअभावी गेल्या वर्षभरापासून बंद आहेत. या योजनांसाठी शेतकर्यांनी सुमारे सहा कोटी रुपये खर्च केले असून, वीज जोडणी मिळत नसल्याने सिंचनाचा लाभ घेता येत नाही. या गंभीर प्रश्नात लक्ष घालून तो सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन खासदार संजय राऊत यांनी शेतकर्यांना दिले.
शुक्रवारी (दि. 9 ऑक्टोबर) जारकरवाडी येथील डिंभा धरणाच्या उजव्या कालव्याजवळ शेतकर्यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. यावेळी त्यांना उपसा सिंचन योजनांची सद्यःस्थिती आणि वीज जोडणीअभावी शेतकर्यांना भेडसावणार्या अडचणींची माहिती देण्यात आली. वीज जोडणीचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी शासन आणि संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. शेतकर्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर या प्रश्नात तातडीने लक्ष घालणार असून, यासंदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.
धामणी परिसर हा जिरायती भाग म्हणून ओळखला जातो. येथील शेती प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने शेतकर्यांनी एकत्र येत नऊ सामूहिक उपसा सिंचन योजना उभारल्या. या योजनांसाठी अनेक शेतकर्यांनी पतसंस्थांकडून कर्ज घेतले, तर काहींनी दागिने गहाण ठेवून निधी उभा केला. मात्र, राज्य शासनाच्या कृषी पंपांसाठीच्या सौर धोरणामुळे या योजनांना वीज जोडणी मिळण्यात अडचणी निर्माण झाल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे. परिणामी, मोठी आर्थिक गुंतवणूक करूनही सिंचन योजनांचा उपयोग होत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर, ज्येष्ठ शिवसेना नेते प्रा. राजाराम बाणखेले, सचिन लबडे, धामणीच्या सरपंच प्रतीक्षा जाधव, पक्षाचे उपतालुकाप्रमुख महेश वाघ, भाऊसाहेब करंडे, दीपक जाधव, बाळासाहेब विधाटे, सुरेखा निघोट, अनिल निघोट यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थित होते. सुमारे सहा कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या या नऊ उपसा सिंचन योजना सुरू झाल्यास धामणी परिसरातील शेतीला मोठा आधार मिळू शकतो. त्यामुळे महावितरण आणि राज्य शासनाने या प्रश्नात तातडीने लक्ष घालून वीज जोडणीबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.
आश्वासनानंतरही प्रश्न प्रलंबित
या प्रश्नावर माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत आवाज उठविला होता. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतरही वीज जोडणीचा प्रश्न मार्गी लागलेला नसल्याने शेतकर्यांमध्ये नाराजी आहे. या मागणीसाठी माजी सरपंच सागर जाधव यांच्यासह काही शेतकर्यांनी यापूर्वी उपोषणही केले होते.
सहा कोटींची गुंतवणूक; सिंचन मात्र ठप्प
धामणी येथे नऊ सामूहिक उपसा सिंचन योजना उभारल्या.
योजनांसाठी शेतकर्यांचा सुमारे सहा कोटी रुपयांचा खर्च.
वीज जोडणीअभावी गेल्या वर्षभरापासून योजना बंद.
वीज जोडणीचा प्रश्न सोडविण्यासाठी संजय राऊत शरद पवार यांच्याशी चर्चा करणार.





