हवामान बदलाचा कहर.! जगाच्या नकाशावरून गायब होऊ शकतात ‘हे’ १० देश

Climate change | world News : समुद्राच्या पातळीत वाढ हा हवामान बदलाचा सर्वात गंभीर परिणाम आहे, वाढत्या पाण्यामुळे लहान बेटांचे देश आणि किनारी प्रदेश बुडण्याचा मोठा धोका आहे. या बदलामुळे मालदीव, तूवालू, बांगलादेश आणि मार्शल बेटे इत्यादी देश गायब होण्याची भीती आहे. आज आपण अश्याच दहा देशांबद्दल बोलणार आहोत जे, हवामान बदलामुळे गायब होऊ शकतात…
मालदीव : हवामान बदलामुळे समुद्राची पाणीपातळी वाढून गायब होईल असा देश म्हणजे मालदीव. मालदीव मधील सगळ्यात उंच जागा समुद्रसपाटीपासून 1.5 मीटर उंचीवर आहे. हा देश पृथ्वीवरील असा देश आहे जो साधारणपणे समुद्र सपाटीपासून थोडासाच वर आहे.
अमेरिकेची राष्ट्रीय अंतराळ संशोधन संस्था नासाने 2024 मध्ये जारी केलेल्या सॅटॅलाइट डेटानुसार समुद्राची पातळी दरवर्षी 3.3 मिलिमीटर ने वाढत आहे. या वेगाने 2100 सालापर्यंत मालदीवची 80 टक्के जमीन ही पाण्याखाली असेल. त्यामुळे पर्याय म्हणून मालदीवने अन्य देशांकडून जमीन विकत घेणे सुरू केलेले आहे.
तूवालू : या देशात 11000 नागरिक राहतात आणि ते आपला देश हळूहळू बुडत असल्याचे पहात आहेत. प्रशांत महासागरातील या देशात जेव्हा समुद्राच्या उंच लाटा येतात तेव्हा पूर येतो. समुद्राचे खारट पाणी हे गोड्या पाण्यात मिसळले जाते आणि त्यामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो, तसेच पिके देखील नष्ट होतात.
2024 मध्ये करण्यात आलेल्या अभ्यासानुसार दरवर्षी किनारपट्टीवर होणारी धूप आणि समुद्राची पाणी पातळी वाढत असल्याने तवालू दोन सेंटीमीटर जमीन गमावत आहे. या देशाच्या सरकारने मेटावर्सवर डिजिटल नेशन स्थापन केले आहे. म्हणजेच जरी का या देशाची संपूर्ण जमीन पाण्याखाली गेली तरी या देशाची संस्कृती आणि स्वायत्तता डिजिटल स्वरूपात टिकून राहील.
किरीबाती : या देशाचे अध्यक्ष एकदा म्हणाले होते. की पृथ्वीवरील हवामान बदलाचा सर्वाधिक फटका बसणारा देश म्हणजे किरीबाती हा आहे. हा देश समुद्रसपाटीपासून जेमतेम दोन मीटर उंचावर आहे. 2024 मधील हवामान बदलाच्या अंदाजानुसार किरीबातीमधील जवळपास सर्व जमीन 2050 पर्यंत राहण्यायोग्य नसेल.
कारण बहुतांश जमिनीवर खारेपाणी घुसलेले असेल आणि सतत पूर येत असतील. ही बाब लक्षात घेऊन किरीबाती सरकारने फिजी बेटावर सहा हजार एकर जमीन खरेदी केली आहे आणि त्या ठिकाणी एक लाख वीस हजार नागरिकांचे स्थलांतर करण्याची या देशाची योजना आहे. असे झाले तर हवामान बदलामुळे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करावे लागण्याची ही पहिली घटना ठरणार आहे.
मार्शल बेटे : अणुचाचण्या आणि समुद्राची वाढती पाणीपातळी यांचे मार्शल बेटांवर अतिशय गंभीर असे दुहेरी ओझे आहे. ही बेटे हवामान बदलामुळे समुद्राची पाणी पातळी वाढल्याने बुडण्याच्या स्थितीत आहे. त्याचबरोबर अनेकदा या ठिकाणी अणुचाचण्या घेण्यात आल्यामुळे किरणोत्सारी पदार्थांच्या भेसळीचा सामना येथील नागरिक करत आहेत.
समुद्राच्या उंच लाटा नेहमी या बेटावर धडकत असतात. त्यामुळे अनेक घरांना पुराचा सामना करावा लागतो. अनेकदा मोठ्या लाटांमुळे घरे, शाळा अगदी विमानतळ देखील पाण्याखाली जाते. त्यामुळे अशी परिस्थिती उद्भवली की अनेकदा नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची वेळ येते. या बेटांवर सुमारे 70 हजार लोकवस्ती आहे.
सेशेल्स बेटे : पर्यटकांसाठी नंदनवन असलेली ही बेटे देखील हवामान बदलामुळे आणि समुद्राच्या पाणी पातळीत होत असलेल्या वाढीमुळे धोक्यात आलेली आहेत. हिंदी महासागरातील ही बेटे अनेकांसाठी सुट्टीच्या काळातील पर्वणी ठरतात. या बेटांवरील 90% लोकसंख्या ही किनारपट्टीवरील भागात राहते आणि सध्याची हवामान बदलाची स्थिती लक्षात घेता 2021 पर्यंत या बेटा वरील बहुतेक समुद्रकिनारा हा पाण्याने गिळंकृत केलेला असेल.
या बेटांवरील किनारपट्टीची धूप वेगाने वाढत असून किनारपट्टी दरवर्षी जवळपास दहा मीटरने कमी होऊ लागलेली आहे. या देशाची 65 टक्के अर्थव्यवस्था ही पर्यटन उद्योगावर अवलंबून आहे. अशा स्थितीत किनारपट्टीवर असणारी आलिशान रिसॉर्ट्स ही पाणीपातळी वाढत असल्याने सोडून द्यावी लागत आहेत किंवा इतरत्र हलवावी लागत आहेत.
वनातू : हा देश ज्वालामुखीच्या 83 बेटांपासून बनलेला आहे आणि सातत्याने हवामान बदलांची अनेक धोक्यांची आव्हाने झेलत आहे. 2000 पासून या देशात येणाऱ्या वादळांची तीव्रता ही 75 टक्क्यांनी वाढलेली आहे. समुद्राच्या पाण्याची पातळी वाढण्याबरोबरच अतिशय टोकाचे हवामान निर्माण होण्याच्या घटनाही वारंवार घडू लागलेल्या आहेत. त्यामुळे या देशातील दोन हजार लोकांवर स्थलांतर करण्याची वेळ आलेली आहे.
बांगलादेश : बांगलादेश हा जवळपास समुद्रसपाटीला असणारा देश आहे. या देशाची लोकसंख्या सुमारे 16 कोटी एवढी आहे. हवामान बदलांमुळे या देशात समुद्राच्या पाण्याची पातळी वाढण्याबरोबरच महापुराच्या घटनाही वाढू लागलेल्या आहेत. दरवर्षी पुराचा फटका 26 लाख लोकांना सहन करावा लागतो.
अनेकदा समुद्राचे खारट पाणी आत शिरल्यामुळे लोकांना भाताचे उभे पीक सोडून द्यावे लागते. भातावरच या देशातील लोकांचे जीवन अवलंबून आहे. हवामान शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार 2050 पर्यंत बांगलादेशची 17% जमीन ही पाण्याखाली गेलेली असेल आणि त्यामुळे सुमारे दोन कोटी लोक निर्वासित होतील.
नेदरलँड : अभियांत्रिकी विरुद्ध निसर्ग असा लढा कायम या देशात चालू असतो. या देशामध्ये पुराचे व्यवस्थापन करण्यासाठी अतिशय अभिनव कल्पना राबवण्यात आल्या असल्या तरी सुद्धा या देशासमोर हवामान बदलामुळे अनेक अनपेक्षित संकटे उभे राहतात. या देशाची जवळपास एक तृतीयांश लोकसंख्या ही समुद्राच्या पाण्याच्या पातळीच्या खाली राहते.
नेदरलँडच्या सरकारकडून दरवर्षी समुद्रकिनारी बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंती, पाणी उपसण्यासाठीचे पंप, पूरनियंत्रणासाठीची उपकरणे या सगळ्याची देखभाल म्हणून जवळपास एक अब्ज युरो खर्च केले जातात. त्यातून जवळपास एक कोटी सत्तर लाख लोकांचे पुरापासून संरक्षण केले जाते.
मात्र नुकत्याच आलेल्या वादळानंतर ही बाब लक्षात आली आहे, की नेदरलॅंडने संरक्षणासाठी जी यंत्रणा आणि भिंती उभ्या केल्या आहेत त्या अपुऱ्या आहेत. 2100 पर्यंत या देशाला लागून असलेल्या समुद्राची पाणी पातळी एक ते दोन मीटरने वाढेल असा अंदाज आहे.





