पहारेकरी विसापूर उर्फ संबळगड

पवन मावळ व नाणे मावळ यांच्या सीमेवर बरोबर मध्यभागी असलेला आणि लोणावळा (बोर) घाटाचे संरक्षक म्हणून उभा असलेला विसापूर उर्फ संबळगड हा किल्ला लोहगड या तत्कालीन अतिमहत्वाच्या अशा किल्ल्याजवळ उभा असूनही पूर्वीपासूनच दुर्लक्षित राहिला असल्याने इतिहासात फार मोठे असे स्थान मिळवू शकला नाही.
विसापूर हा किल्ला सुमारे 2000 वर्ष जुना म्हणजे सातवाहन काळातील असल्याचे दाखले मिळतात. 1657 मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि त्याचवेळी लोहगड-विसापूर हा सर्व परिसरसुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला. या किल्ल्याचा पृष्ठभाग संबळाच्या आकाराचा असल्याने शिवाजी राजांनी याचे संबळगड असे नामकरण केले.
इ. स. 1665 मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात देण्यात आलेल्या 23 किल्ल्यांच्या यादीमध्ये संबळगडाचा समावेश असल्याने हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला गेला. 1670 साली मराठ्यांनी तो पुन्हा एकदा जिंकून घेतला केला. पुढे मराठे 1682 सालच्या ऑक्टोबर महिन्यात पुण्याच्या उत्तर बाजूला स्वारीसाठी गेले. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मोगल सरदार शहाबुद्दीन चाकणमध्ये होता. मराठे लोहगडाच्या बाजूला आल्याचे समजल्यावर तो तेथे पोचला. तेथे त्याने केलेल्या चकमकीत 60 माणसांची कत्तल झाली.
परंतु तेथून मराठे विसापूर किल्ल्यावर गेल्याचे समजताच तो तेथे पोचला, पण तोपर्यंत मराठे कुसापुर गावाजवळ पोचले. एकूणच 1682 मध्ये मराठ्यांचा आणि मोगलांचा शिवाशिवीचा खेळ असा चालूच होता. 4 मार्च 1818 ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसऱ्याच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले.
विसापूर किल्ल्यावर पाण्याची सर्वाधिक म्हणजे 85 टाकी आहेत. किल्ल्याला उत्तरेकडील दिल्ली दरवाजा तर दक्षिणेकडील कोकण दरवाजा असे एकून दोन दरवाजे आहेत. पाटण गावाच्या बाजूने किल्ल्यावर चढून आल्यावर पाण्याची पाच टाकी लागतात. यावर बौद्धकालीन बुद्धचक्र व त्रिरत्न चिन्ह कोरलेली असून, तेथेच पाली भाषेतील शिलालेख कोरलेला आहे. तेथूनच पुढे आल्यावर समोरच एक तोफ दिसते. त्यावर असलेले गुलाबपुष्पाचे चिन्ह हे ब्रिटनमधील ट्युडर घराण्याचे चिन्ह असून, ही ब्रिटिश तोफ सरदार कान्होजी आंग्य्रांच्या कालखंडात म्हणजे 18 व्या शतकाच्या सुरवातीस येथे आणली असल्याची शक्यता आहे. गडावरील पठारावर लांबवर पसरलेली अजूनही बऱ्यापैकी स्थितीमध्ये असलेली तटबंदी आपले लक्ष्य वेधून घेते. पायऱ्यांच्या साहाय्याने किल्ल्यावर जाताना एक मारुतीचे देऊळ लागते. तेथे बाजूलाच दोन गुहा आहेत. यात 30 ते 40 जणांची राहण्याची सोय होते. मात्र पावसाळ्यात गुहेत पाणी साठते. गडावर पाण्याची तळी आहेत. गडावर बांधकामासाठी वापरण्यात येणारा चुना मळण्यासाठी लागणारे एक मोठे जातंही आहे.
गडावर जाण्यासाठी मुंबई-पुणे लोहमार्गावर मळवली या रेल्वे स्थानकावर उतरावे. येथून भाजे गावात यावे. भाजे गावातून विसापूर किल्ल्यावर जाण्यास दोन वाटा आहेत. पहिल्या वाटेने गडावर जायचे झाल्यास वाटाड्या घेणे आवश्यक ठरते. भाजे लेण्यांना जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या पायऱ्या सोडून एक पायवाट जंगलात गेलेली दिसते. उजवीकडची पायवाट धरल्यावर 20 मिनिटे चालून गेल्यावर काही घरे लागतात. या वाटेने आपण मोडकळीस आलेल्या पायऱ्यांपाशी पोचतो. येथे बाजूलाच एक मंदिर आहे.
दुसऱ्या वाटेने भाजे गावातून गायमुख खिंडीपर्यंत यावे. गायमुख खिंडीतून डावीकडे जंगलात जाणारी वाट थेट विसापूर किल्ल्यावर घेऊन जाते. तसेच मळवली स्थानकातून बाहेर आल्यावर वाटेत एक्स्प्रेस वे लागतो. हा मार्ग पार करण्यासाठी बांधलेल्या पादचारी पुलावरून डावीकडे उतरणारा जिना उतरल्यावर पाटण गाव लागते. याच पाटण गावातून विसापूरवर जाण्याचा रस्ता आहे. या किल्ल्याची तटबंदी, येथील जाते, पाण्याची टाकी, मारूतीची शिल्प अशा वैशिष्टेपूर्ण गोष्टी बघण्यासाठी गिरीप्रेमींनी या किल्ल्याला एकदातरी अवश्य भेट द्यावी.





