Pimpri : विसापूर किल्ला परिसरात भरकटलेल्या तीन पर्यटकांची सुखरूप सुटका

कार्ला : पावसाळ्यात गड-किल्ल्यांवर मोठ्या संख्येने पर्यटकांची गर्दी होत असताना, विसापूर किल्ला परिसरात भरकटलेल्या तीन तरुण पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू पथकाला यश आले आहे. गुरुवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेत पावसामुळे चिखल आणि दाट धुक्यामुळे वाट चुकलेल्या पर्यटकांनी अखेर मदतीसाठी शिवदुर्ग रेस्क्यूशी संपर्क साधला.
ओजस प्रसाद फडके (वय १८), ईशान श्रीराम जोशी (वय १८) आणि आयुष प्रसाद कलबंडे (वय १८, तिघेही रा. पुणे) हे तरुण लोणावळा परिसरातील लोहगड आणि विसापूर किल्ला पाहण्यासाठी आले होते. मात्र, सायंकाळच्या सुमारास अंधार व धुक्यामुळे त्यांनी रस्ता चुकला आणि जंगलात भरकटले. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन त्यांनी शिवदुर्ग रेस्क्यू पथकाशी संपर्क साधला. माहिती मिळताच पथकातील सागर कुंभार, राहुल वाघमारे व विशाल शिंदे यांनी तातडीने लोकेशन मिळवून शोध मोहीम सुरू केली. पावसात व अवघड परिस्थितीतही अथक प्रयत्न करीत त्यांनी रात्री सुमारे पावणे नऊ वाजता तिघांनाही शोधून सुखरूपपणे मळवली रेल्वे स्थानकात आणून सोडले.





