Shirur News : शिरूरच्या गोपाळ तालीम गणेश मित्र मंडळाचा रौप्यमहोत्सवी वर्धापन दिन उत्साहात साजरा

शिरूर : शिरूर शहरातील गोपाळ वस्ती येथील युवा गोपाळ तालीम गणेश मित्र मंडळाने यंदा आपल्या रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करत 25 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा केला. सन २००० मध्ये पैलवान नारायण पवार, राजेंद्र नाना पवार आणि कै. शिवाजीराव गव्हाणे यांच्या प्रयत्नातून स्थापन झालेले हे मंडळ आज सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यात आदर्श म्हणून ओळखले जाते.
मंडळाचा अष्टविनायक राजा गणपती वर्षभर भाविकांसाठी दर्शनास उपलब्ध असतो आणि शिरूर, पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातील भक्तांमध्ये नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. अष्टविनायकांनी सुशोभित असलेल्या या गणपतीच्या आसनाला विशेष धार्मिक महत्त्व आहे.रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त मंडळाने यंदा तामिळनाडूतील वेल्लोर येथील लक्ष्मीनारायण सुवर्ण मंदिराची भव्य प्रतिकृती साकारली आहे.
हा देखावा भक्तांसाठी एक दैवी आणि अविस्मरणीय अनुभव ठरत आहे.गेल्या २५ वर्षांपासून मंडळाने रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे, शैक्षणिक साहित्य वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, क्रीडा स्पर्धा, तालीम परंपरेचा प्रसार, स्वच्छता अभियान आणि सामाजिक संदेश देणारे हलते देखावे यासारख्या उपक्रमांद्वारे समाजाशी दृढ नाते जोडले आहे.मंडळाचे विद्यमान अध्यक्ष निलेश पवार यांच्या नेतृत्वाखाली रौप्यमहोत्सवी पर्व उत्साहात साजरे होत आहे. प्रकाश धारीवाल यांच्यासह अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन मंडळाला लाभत आहे.





