Uddhav Thackeray : वर्धापन दिनीच उद्धव ठाकरेंना धक्का ! ठाकरेंच्या ‘या’ 3 शिलेदारांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

ठाणे : शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याने प्रभावित होऊन आज मुंबईतील ठाकरेसेनेच्या तीन शिलेदारांनी शिंदेसेनेत जाहीर प्रवेश केला. याशिवाय ठाणे तसेच गोवा राज्यातील ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. ठाण्यात झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात आमदार दिलीप लांडे, शिवसेना सचिव राम रेपाळे उपस्थित होते.
या पक्ष प्रवेशाने शिवसेना वर्धापन दिनीच ठाकरेसेनेला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. ठाकरेसेनेचे विभागप्रमुख आणि माजी नगरसेवक अजित भंडारी, शाखाप्रमुख संजय जंगम, माजी नगसेवक विजेंद्र शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेविका नादिया शेख आणि शिवसेना युवा सेना सचिव मोहसीन शेख यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
तसेच गोवा राज्यातील ठाकरेसेनेचे माजी राज्य प्रमुख उपेंद्र गावकर, काँग्रेस महासचिव काशिनाथ मयेकर, पाच तालुकाप्रमुख, एक शहर प्रमुख, विभागप्रमुख आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. ठाण्यातील अनेक उपशाखाप्रमुख, गटप्रमुख यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत सामील झालेल्या लोकप्रतिनिधींच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. त्यांच्या प्रभागांतील विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.





