सरलेल्या वर्षाचा विकास दर समाधानकारक

नवी दिल्ली – केंद्रीय सांख्यिकी विभागाने जाहीर केलेल्या माहितीनुसार सरलेल्या 2021-22 या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर 8.7 टक्के भरला आहे. सांख्यिकी विभागाने या वर्षाचा विकास दर 8.9 टक्के होईल असे अगोदर सांगितले होते. त्यापेक्षा हा विकास दर 0.2 टक्क्यांनी कमी झाला आहे. मात्र तरीही हा विकास दर समाधानकारक असल्याचे दिसून येते.
जानेवारी ते मार्च या चौथ्या तिमाहीत विकास दर कमी होऊन 4.1 टक्के इतका झाला आहे. त्या अगोदरच्या म्हणजे ऑक्टोबर ते नोव्हेंबर या तिसऱ्या तिमाहीत भारताचा विकास दर 5.4 टक्के इतका होता. त्या अगोदरच्या 2020-21 वर्षात करोनाने भारतात धुमाकूळ घातल्यामुळे भारताचा विकासदर उणे 6.6 टक्के इतका होता. त्यामुळे या वर्षी वाढलेला विकास दर नजरेत भरण्यासारखा आहे.
चौथ्या तिमाहीत भारताचा विकास दर 4.1 टक्के भरला आहे. तर चौथ्या तिमाहीमध्ये चीनचा विकासदर हा 4.8 टक्के इतका नोंदला गेला आहे. त्यामुळे चौथ्या तिमाहीत चीनचा विकासदर भारतापेक्षा जास्त असल्याचे दिसून येते.
सांख्यीकी विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सरलेल्या वर्षांमध्ये कृषि, वन आणि मत्स्य पालन क्षेत्र तीन टक्क्यांनी वाढले आहे. खान क्षेत्र 11.5 टक्क्यांनी वाढले आहे. मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची उत्पादकता 9.9 टक्क्यांनी, वीज निर्मिती 7.5 टक्क्यांनी, बांधकाम क्षेत्र 11.5 टक्क्यांनी, हॉटेल, वाहतूक क्षेत्र 11.1 टक्क्यांनी वाढले आहे.
मॅन्युफॅक्चरिंग आणि बांधकाम क्षेत्राची उत्पादकता वाढल्यामुळे एकूण वर्षाचा विकास दर वाढण्यास मदत झाली आहे. गेल्या वर्षाप्रमाणे या वर्षीही कृषी क्षेत्राची उत्पादकता तीन टक्क्यानी वाढल्यामुळे भारताचे राष्ट्रीय उत्पन्न वाढण्यास मदत झाली असल्याचे दिसून येते.





