India Growth Rate: भारताच्या ऊर्जा सुरक्षेवर परिणाम झाल्यामुळे कापड, पेंट्स, रसायन, खते, सिमेंट, टायर इत्यादी क्षेत्राच्या उत्पादकतेवर परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत इराण -अमेरिका युद्ध लांबले तर 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये भारताचा विकासदर किमान एक टक्क्याने कमी होण्याची शक्यता आहे. अर्नेस्ट अँड यंग कंपनीच्या अभ्यास अहवालात ही माहीती देण्यात आली आहे. मुळात भारत ऊर्जेच्या बाबतीत आत्मनिर्भर नाही. जगात कुठेही ऊर्जेसंदर्भात संकट निर्माण झाले तर त्याचा थेट परिणाम भारतावर होतो. आतापर्यंत भारताने ऊर्जा सुरक्षिततेवर परिणाम होऊ दिला नव्हता. मात्र आखात युद्धामुळे सर्वच क्षेत्रावर आता परिणाम होत आहे. त्यामध्ये जास्त रोजगार निर्माण करणार्या कापड, रंग, रसायन, खते, सिमेंट, टायर्स इत्यादी उद्योगाचा समावेश आहे. या उद्योगावर युद्धाचा थेट परिणाम होणार आहे. त्यामुळे रोजगार निर्मितीवर परिणाम झाला तर एकूणच मागणी आणि पुरवठ्यावर परिणाम होऊन विकासदरावर याचा नकारात्मक परिणाम होणार असल्याचे या संस्थेने म्हटले आहे. हेही वाचा – शेअर बाजारात मोठी घसरण! पण पुढच्या सहा महिन्यांत येणार जबरदस्त तेजी? भारत खनिज तेल व स्वयंपाकाच्या गॅसबरोबरच इतर नैसर्गिक वायू आणि खताची मोठ्या प्रमाणात आयात करतो. या दोन्ही बाबीवर परिणाम झालेला आहे. याचा परिणाम इतर क्षेत्रावर होणार आहे. नैसर्गिक वायू उपलब्ध नसल्यामुळे खत, सिरॅमिक इत्यादी उद्योगाची उत्पादकता थंडावली आहे. या क्षेत्रावर अवलंबून असलेल्या इतर क्षेत्रावर म्हणजे शेतीवर याचा परिणाम होणार आहे. इंधन पुरवठा, साठवणूक, वाहतूक इत्यादी क्षेत्रावर परिणाम होणार आहे. जरी युद्ध इतक्यात थांबले तरी हा परिणाम भरून काढण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे. या संस्थेने यावर्षी भारताचा विकासदर 6.8 ते 7.2% राहिला असे सांगितले होते. आता यामध्ये एक टक्क्याची घट होऊ शकते. महागाई वाढणार दीड टक्क्यांनी – आतापर्यंत म्हणजे फेब्रुवारी महिन्यापर्यंत तरी भारतातील किरकोळ किमतीवर आधारित माहागाईचा दर चार टक्क्यांच्या पुढे गेलेला नाही. मात्र मार्च महिन्यामध्ये परिस्थिती बिघडली आहे. अशा परिस्थितीत आगामी पूर्ण वर्षाचा महागाईच दरचार टक्क्याऐवजी साडेपाच टक्क्यापर्यंत वाढण्याची भीती या संस्थेने व्यक्त केली आहे. इंधनाचे दर वाढणार असल्यामुळे वाहतुकीचा दर वाढेल आणि त्यामुळे सर्वच क्षेत्रावर याचा परिणाम होणार आहे.