नवी दिल्ली – अमेरिकेने भारताविरोधात 27 टक्के आयात शुल्क लावण्याची घोषणा केली आहे. यामुळे अमेरिकेला भारताची होणारी निर्यात दोन ते तीन टक्क्यांनी कमी होऊ शकते. अशा परिस्थितीत भारताचा यावर्षीचा विकास दर अर्धा टक्क्याने कमी होऊन सहा टक्के होण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. अर्नेस्ट अँड यंग कंपनीचे धोरण सल्लागार डी के श्रीवास्तव यांनी सांगितले की, भारताच्या स्पर्धक देशांपेक्षा भारतावर अमेरिकेच्या व्यापार धोरणाचा अत्यल्प परिणाम होणार आहे. त्याचबरोबर लवकरच भारत -अमेरिका व्यापार करार होण्याची शक्यता गृहीत धरण्यात येत आहे. अशा परिस्थितीत भारत यातून लवकर बाहेर पडू शकेल. ते म्हणाले की, अमेरिकेच्या धोरणामुळे अमेरिकेत जाणार्या वस्तू महाग होतील आणि एकूण महागाई वाढेल. अशा परिस्थितीत अगोदरच अमेरिकेचा डॉलर कमकुवत होत आहे. त्यामुळे अमेरिकेत मंदी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे भारताकडून परकीय चलन साठ्यात फारशी घट होणार नाही. स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या संशोधन प्रमुख अनुभूती सहाय यांनी सांगितले की, प्रत्यक्षात अमेरिकेने भारतावर 20 टक्के आयात शुल्क लावले आहे. कारण बर्याच वस्तूंना आयात शुल्कातून वगळले आहे. आमच्या मूल्यांकनप्रमाणे अमेरिकेला होणारी निर्यात कमी होऊन भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नावर याचा 0.35 ते 0.40% परिणाम होऊ शकतो. पुन्हा आर्थिक शिथीलीकरण दरम्यान 1991 मध्ये भारताने आयात शुल्कात मोठ्या प्रमाणात घट करून अर्थव्यवस्था खुली केली होती. मात्र त्यानंतर हळूहळू पुन्हा भारत सरकारने विविध वस्तूवर आयात शुल्क लावले आहे. त्यामुळे आता भारतातील आयात शुल्क सर्वात जास्त शुल्कापैकी एक आहे. ही वस्तुस्थिती मान्य करून भारत सरकारने नजीकच्या भविष्यात उद्योगांना विश्वासात घेऊन आयात शुल्क कमी केले तर अशा प्रकारचे पेचप्रसंग पुन्हा निर्माण होणार नाहीत, असे काही अर्थतज्ज्ञांनी सुचविले. आयात वाढविण्याचा पर्याय भारत- अमेरिका व्यापारातील तूट कमी करण्यासाठी भारताने अमेरिकेवर आयात शुल्क लावण्याऐवजी ही तूट भरून काढण्यासाठी काही वस्तूची आयात वाढविण्याची गरज व्यक्त करण्यात आली. भारत अमेरिकेकडून खनिज तेल, नैसर्गिक वायू, विमान, अणुभट्ट्या आणि संरक्षण साहित्याची आयात करू शकतो. असे झाले तर व्यापारातील तूट कमी होईल. त्यामुळे भारत- अमेरिका व्यापारात संतुलन निर्माण होईल.