ऑगस्टमध्ये जीएसटी संकलन वाढले; 1.86 लाख कोटी रुपयाचे झाले कर संकलन

नवी दिल्ली : गेल्या आठवड्यात पहिल्या तिमाहित वाढीव विकासदराची आकडेवारी जाहीर झाली असतानाच ऑगस्ट महिन्यातील जीएसटी कर संकलन 6.5 टक्क्यांनी वाढल्याची आकडेवारी अप्रत्यक्ष कर विभागाने जारी केले आहे. या विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्यात तब्बल 1.86 लाख कोटी रुपयांचे कर संकलन झाले आहे.
दरम्यानच्या काळात केंद्र सरकारने जीएसटी दर कपात करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या संबंधात या आठवड्यात जीएसटी परिषदेची बैठक होणार आहे. अशा परिस्थितीत जर जीएसटीच्या दरात कपात झाली तर आगामी काळात काही महिने तरी जीएसटी संकलनात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये 1.75 लाख कोटी रुपयांचे कर संकलन झाले होते. तर जुलै महिन्यामध्ये 1.96 लाख कोटी रुपयांचे कर संकलन झाले होते. म्हणजे वार्षिक पातळीवर कर संकलनात वाढ झाली असली तरी मासिक पातळीवर मात्र या कर संकलनात घट झाली आहे.
ऑगस्ट महिन्यात देशांतर्गत कर संकलन 9.6% नी वाढून 1.37 लाख कोटी रुपये इतके झाले आहे. तर आयातीद्वारा होणारे कर संकलन 1.2 टक्क्यांनी कमी होऊन 49, 354 कोटी रुपये इतके झाले आहे. या महिन्यात जीएसटी विभागानेे दिलेला कर परतावा 20 टक्क्याने कमी होऊन 19,359 कोटी रुपये इतका झाला आहे. यामुळे ऑगस्ट महिन्यात झालेले निव्वळ जीएसटी संकलन वार्षिक पातळीवर 10.7 टक्क्यांनी वाढूव 1.67 लाख कोटी रुपये इतके झाले आहे.आता कर विभागाचे आणि उद्योग व्यवसायाचे लक्ष दोन दिवसांनी होणार्या जीएसटी परिषदेच्या बैठकीकडे लागले आहे.
या बैठकीत केंद्र सरकारने सुचविलेल्या जीएसटी दर कपातीवर विचार होणार आहे. कराचे अगोदर चार टप्पे होते ते आता दोन टप्पे करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. मात्र राज्यांनी जर या कर कपातीची अंमलबजावणी झाली तर केंद्र सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे. मात्र या विषयावर अर्थ मंत्रालयाने अजूनही कसलीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.





