आर्थिक वर्ष 2024-25चा विकास दर 6.4% राहील; सांख्यिकी मंत्रालयाचा अंदाज

नवी दिल्ली – चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन तिमाहीत विकासदर बराच कमी झाला आहे. मात्र तरीही उरलेल्या दोन तिमाहीत ही तूट भरून निघेल आणि एकूण 2024-25 या आर्थिक वर्षाचा विकासदर 6.4% राहील असा अंदाज सांख्यिकी मंत्रालयाने जाहीर केला आहे.
गेल्या वर्षी विकासदर 8.2% होता. अर्थ मंत्रालयाने या वर्षाचा विकासदर 6.5% राहील असे म्हटले आहे तर रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षाचा विकास दर 6.6% राहील असे सांगितले आहे. सर्वच विभागांनी जाहीर केलेला अंदाज गेल्या वर्षापेक्षा कमी आहे.
सांख्यिकी विभागाने सांगितले की, पहिल्या दोन तिमाहित विकास दर कमी झाला असला तरी आगामी काळामध्ये कृषी क्षेत्राची आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची उत्पादकता वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत एकूण वर्षाचा विकासदर 6.4% पर्यंत वाढू शकतो.
विषम पर्जन्यमानामुळे गेल्या वर्षाचा कृषी क्षेत्राचा विकासदर केवळ 1.4 टक्के इतका होता. यावर्षी देशभर चांगला पाऊस पडल्यामुळे रब्बी आणि खरिपाचे उत्पन्न वाढणार आहे. अशा परिस्थितीत यावर्षी कृषी क्षेत्राचा विकासदर किमान 3.8 टक्के राहील.
बांधकाम क्षेत्र अर्थव्यवस्थेला चांगलाच आधार देणार असून या क्षेत्राचा विकासदर 8.6% राहण्याची शक्यता आहे. वित्तीय सेवा आणि व्यावसायिक सेवा क्षेत्र हे अपेक्षित दराने वाढत आहे. नागरिकाकडून खर्च वाढत असल्याचे आकडेवारी सांख्यिकी विभागाकडे आली आहे. त्यानुसार यावर्षी खासगी क्षेत्रातील मागणी 7.3 टक्क्यांनी वाढणार आहे.
जी की गेल्या वर्षी चार टक्के होती. त्याचा परिणाम पहिल्या दोन तिमाहीवर झाला आहे. महागाई आणि इतर कारणामुळे खासगी क्षेत्रातून खर्च कमी झाला होता. याबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत होती. शहरातील मध्यमवर्गीयाकडून खरेदी कमी झाल्यामुळे ग्राहक वस्तू निर्माण करणार्या कंपन्या व त ताळेबंदावर परिणाम झाला होता.
मात्र आता शहरातील आणि ग्रामीण भागातील नागरिकाकडून खर्च वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत त्याचा अर्थव्यवस्थेला आधार मिळू शकतो असे सांगण्यात आले. केंद्र सरकार आपला भांडवली आणि इतर खर्च वाढवत आहे. त्यामुळे विकासदराला आधार मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान यावर्षीचा विकासदर कमी होणारा असला तरी तो इतर देशांपेक्षा जास्तच राहील असे गृहीत धरण्यात येत आहे.





