सरकारने दिलेला शब्द पाळावा; कुस्तीपटूंनी व्यक्त केली अपेक्षा

नवी दिल्ली -दिल्ली पोलिसांनी भारतीय कुस्तीगीर महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात 1500 पानी आरोपपत्र दखल केल्यामुळे आम्हाला दिलासा मिळाला आहे. मात्र, या आरोपपत्रात कोणकोणते आरोप केले आहेत याची माहिती आमचेही वकील घेत आहेत.
या चौकशी व तपासातून काय बाहेर येते हे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. सरकारने आम्हाला दिलेला शब्द पाळावा हीच आमची अपेक्षा आहे, असे मत आंदोलक कुस्तीपटूंमधील एक साक्षी मलिक हिने व्यक्त केली आहे.
ब्रिजभूषण यांच्यावर बाललैंगिक अत्याचार (पॉक्सो) प्रकरणातून करण्यात आलेला आरोप मागे घेतला गेला असला तरीही तब्बल 1500 पानांचे नवे आरोपपत्र पोलिसांनी दाखल केले आहे. बिजभूषण यांच्यासह काही प्रशिक्षक, सहाय्यक प्रशिक्षक तसेच महासंघातील काही सदस्य देखील यात गोवले गेले आहेत.
आम्ही आमचे जबाब यापूर्वीच नोंदवले होते, त्यानंतरही आमची अनेकदा चौकशीही झाली. त्यावेळी पोलिसांनी एका अल्पवयीन महिला कुस्तीपटूने जबाब फिरवल्याचे सांगतले व त्यामुळे हा पॉक्सोचा आरोप वगळण्यात आला आहे.
अन्य खटल्यांचाही अभ्यास सुरू आहे, असा खुलासा दिल्ली पोलिसांनी केला आहे. मात्र, केवळ इतक्यावर आमचे समाधान होणार नाही. त्यांनी ठोस कारवाई करणे गरजेचे आहे.
दरम्यान, कुस्तीपटूंनी केलेल्या एकाही आरोपात तथ्य नाही. मी कोणत्याची चौकशीला सामोरा जाण्यास तयार आहे. पोलिसांनी इतक्या पानांचे आरोपपत्र सादर केले असले तरीही त्यासाठी पुरावे लागतात व मी काहीही गैर केले नसल्याने मला त्याची भीती वाटत नाही. सत्य काय आहे ते लवकरच समोर येईल, अशा शब्दात ब्रिजभूषण यांनी आपली बाजू मांडली आहे.
ब्रिजभूषण यांना अटक हेच ध्येय
महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप कुस्तीपटूंनी केला होता व ब्रिजभूषण यांना अटक करण्याची प्रमुख मागणीही केली होती. आता न्यायालयात 1500 पानांचे आरोपपत्र दाखल झालेले असताना त्यांनाही अटक झालीच पाहिजे या मागणीवर आम्ही ठाम असल्याचे मत साक्षीने व्यक्त केले आहे.





