लोणी काळभोर -कंपनीमध्ये कोणत्याही पदावर नोकरीस नसताना वाहने भाडेतत्वावर लावतो, असे अमिष दाखवून 2 कोटी 40 हजार रूपये किंमतीची 28 वाहने भाडयाने घेऊन वाहनांचा अपहार व वाहनांचे थकित 15 लाख रूपये भाडे न देता एकूण 2 कोटी 55 लाख रुपयांची फसवणूक करीत वाहने परराज्यात विक्री करणाऱ्या 3 जणांच्या सराईत टोळीस गुन्हे शाखा युनिट 6 ने जेरबंद करून 28 पैकी 13 वाहने जप्त केले.
याप्रकरणी अविनाश बालाजी कदम ( वय 28 रा. हरपळेवस्ती, फुरसुंगी, मूळ रा.जळकोटवाडी, जि. उस्मानाबाद) यांनी फिर्याद दिली. मलिक बाबा शहा ऊर्फ मुजाहिद रफिउद्दीन सय्यद गिलानी (रा. शिवनेरीनगर, कोंढवा), ओंकार वाटाणे (28, रा. हिंगणी बेर्डी, दौंड) व मोहमद मुजीब मोहमद बसीरउद्दीन (हैद्राबाद), असे अटकेतील तिघांची नावे आहेत.
कदम हे ओला कंपनीमध्ये स्वत:ची स्विफ्ट डिझायर कार चालविताना त्यांची ओळख गिलानीशी झाली. त्याने तो नोएडा, उत्तर प्रदेश येथील युनायटेड एसएफसी सर्व्हिस नावाची नेटवर्क टॉवरची कंपनीमध्ये नोकरीस असल्याचे सांगून त्या कंपनीमध्ये वाहने भाडेतत्वावर लावतो, असे अमिष दाखवून 15 मार्च ते 27 जुलै या साडेचार महिन्याच्या कालावधीत कदम व त्यांच्या ओळखीच्या इतरांची एकूण 28 चारचाकी वाहने ताब्यात घेतली.
या वाहनांची जीपीएस यंत्रणा काढून टाकली व वाहने घेवून फसवणूक करून तो फरार झाला होता. कदम यांनी कंपनीबाबत उत्तर प्रदेश येथे माहिती काढली असता ही कंपनी आढळली नसल्याने त्याची फसवणूक झाल्याचे समजले. त्यानी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तपास गुन्हे शाखा, युनिट 6 करीत होते.
(दि.14) सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील व पथक पेट्रोलींग करीत होते. गुन्ह्यातील इनोव्हा कार ही दौंड बस स्टॅन्ड परिसरामध्ये विक्रीकरिता येणार आहे. अशी माहिती हवालदार कारखेले व मुंढे यांना मिळाली. तेथे सापळा रचून 3 जणांना कारसह ताब्यात घेवून अटक केली.
न्यायालयाकडून (दि.20) पर्यंत पोलीस कोठडी मिळाल्यानंतर कोठडीदरम्यान महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील नांदेड व तेलंगणा येथून एकूण 13 चारचाकी वाहने जप्त केली आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अप्पर आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, उपायुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे,
सहायक आयुक्त (गुन्हे) लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट 6 चे पोलीस निरीक्षक गणेश माने, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, हवालदार मच्छिंद्र वाळके, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, प्रतिक लाहिगुडे, सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे व सुहास तांबेकर यांच्या पथकाने केली.