पुणे – पीएमआरडीएच्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पासाठी गणेशखिंड रस्त्यावरील विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पूल पाडण्यास परवानगी मिळण्याचा प्रस्ताव पीएमआरडीएने पुणे महानगरपालिकेला पाठविला आहे. परवानगी मिळताच हा पूल पाडण्यात येणार आहे. त्यामुळे हे काम आता परवागीच्या प्रतीक्षेत अडकले आहे.

हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान मेट्रो प्रकल्पाचे काम पीएमआरडीएने हाती घेतले आहे. संपूर्ण मेट्रो मार्ग हा इलेव्हेटेड (उन्नत) असणार आहे. हे काम बीओटी तत्त्वावर टाटा- सिमेन्स या कंपनीला देण्यात आल्या आहेत. या कंपनीकडून या प्रकल्पाचा सर्वंकष प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे.

पीएमआरडीएने हाती घेतलेली मेट्रो पुणे महापालिकेच्या हद्दीत पुणे विद्यापीठ चौकातून गणेशखिंड रस्त्याने जाते. या मार्गावर असलेले तिन्ही उड्डाणपूल हे अडचणीचे ठरत आहे. हे उड्डाणपूल न पाडता मेट्रो मार्गात बदल केला, तर शासकीय आणि खासगी जागा ताब्यात घ्याव्या लागत आहे. त्यातून प्रकल्पाचा खर्च देखील वाढू शकतो. त्याऐवजी हे उड्डाणपूल पाडावेत, असा विचार पुढे आला होता.

करोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या शहरात लॉकडाऊन आहे. सर्वत्र संचारबंदी आहे. या काळात पूल पाडण्यास कोणतीही अडचण येऊ शकत नाही. तसेच वाहतुकीला देखील अडथळा होऊ शकत नाही. त्यामुळे या कालावधीतच हा पूल पाडण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

दुहेरी उड्डाणपूल उभारणार

पुणे विद्यापीठ चौकातील पूल पाडून त्या ठिकाणी दुहेरी उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यापैकी एक पूल हा फक्त मेट्रो प्रकल्पासाठी असणार आहे. तर दुसऱ्या पुलावरून बीआरटी आणि अन्य खासगी वाहनांसाठी त्यांचा वापर होणार आहे. तर त्या खालील रस्त्यावरून अन्य वाहनांना परवानगी देण्यात येणार आहे.