Chhagan Bhujbal : ‘अर्थ’ खाते पुन्हा चर्चेत.! राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; छगन भुजबळ यांनी स्पष्टच सांगितलं…..
कोणतीही निश्चित तारीख सांगता येणार नाही. मात्र, मुख्यमंत्र्यांनी पक्षाच्या मागणीबाबत सकारात्मक दृष्टिकोन दर्शवल्याचा दावा भुजबळ यांनी केला.

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अर्थ खाते आपल्या पक्षाकडे सोपवण्याची मागणी केली आहे, अशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी दिली. मात्र, त्यांनी मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत सुरू असलेल्या चर्चांचे खंडन केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांच्या विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चेबद्दल विचारले असता, तो विषय आता संपलेला अध्याय असल्याचे भुजबळ म्हणाले. भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये अर्थ खाते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे होते.
सध्या अर्थ खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल व छगन भुजबळ यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने रविवारी फडणवीस यांची भेट घेऊन अर्थ खाते आपल्या पक्षाला देण्याची मागणी केली.
या मागणीबाबत मुख्यमंत्र्यांनी काही आश्वासन दिले आहे का, असे विचारले असता, कोणतीही निश्चित तारीख सांगता येणार नाही. मात्र, मुख्यमंत्र्यांनी पक्षाच्या मागणीबाबत सकारात्मक दृष्टिकोन दर्शवल्याचा दावा भुजबळ यांनी केला.
अर्थ खात्याऐवजी दुसरा कोणताही पर्याय स्वीकारला जाईल का, असे विचारले असता, त्यांनी ठामपणे सांगितले, आम्हाला फक्त अर्थ खातेच हवे आहे, असेही त्यांनी नमूद केले.






