पुणे – बदलापूर लैंगिक अत्याचाराच्या घटनेविरोधात संतप्त पडसाद उमटत आहेत. मात्र, लैंगिक अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. नराधम दररोज वेगवेगळ्या रुपात येऊन अल्पवयीन मुलींना आपली शिकार बनवत आहेत. शहरात शुक्रवारी दाखल झालेल्या घटना लक्षात घेता “भय इथले संपत नाही’ अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. शहरात एका दिवसात स्त्री अत्याचाराचे तब्बल १३ गुन्हे दाखल झाले आहेत. यातील बाल लैंगिक अत्याचाराचे (पॉक्सो) तब्बल सहा गुन्हे आहेत. ‘कोलकात्यात काय घडले माहिती आहे का?’ कोलकाता येथे काय घडले माहिती आहे का? असे म्हणत रिक्षा चालकाने सोळा वर्षीय मुलीचा विनयभंग केला. या प्रकरणी रिक्षा चालक गोविंद नेनावत (२३, रा. मानाजीनगर) याच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना नवले पूल ते कात्रज मार्गावर रिक्षा प्रवासादरम्यान घडली. ही मुलगी अल्पवयीन असल्याचा फायदा घेत आरोपीने हे कृत्य केले. संबंधित मुलगी कामानिमीत्त कात्रजकडे जात होती. भयभीत मुलीने घरी पालकांना हा प्रकार सांगितला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कोळी करत आहेत. अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आंदोलनानंतर अॅट्रोसिटी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिला गर्भवती केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी नागरिकांनी आंदोलन केल्यावर अॅट्रोसिटीचे कलमही वाढवण्यात आले आहे. पीडित मुलगी १६ वर्षांची असून इरफान नबिलाल शेख (२२, रा. सहकारनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील पाटील करत आहेत. बस थांब्यावर विनयभंग बस थांब्यावर दोघांनी १७ वर्षीय मुलीचा विनयभंग केला. ही घटना खराडी बायपास बस थांब्यावर घडली. मुलीच्या तक्रारीनुसार संदीप वरवड (२८, रा. हडपसर) आणि विष्णु शिंदे (२७, रा.लोहगाव) यांच्यावर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. दोघेही आरोपी एका सीएच्या हाताखाली काम करता. तर पीडित मुलगी मामाच्या कार्यालयात काम करते. आरोपींनी खराडी येथे विनयभंग केल्यानंतर विश्रांतवाडी चौकापर्यंत तिचा पाठलाग केला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पाडेकर करत आहेत. पीएमपीत तीन मुलींची छेडछाड; कंडक्टरचाही विनयभंग पीएमपीमधून प्रवास करणाऱ्या तीन अल्पवयीन विद्यार्थिनींचा दोघांनी बसमध्ये विनयभंग केला. त्यांना जाब विचारणाऱ्या महिला कंडक्टरलाही शिविगाळ करण्यात आली. तर आरोपींना दटावण्याऱ्या एका ज्येष्ठालाही मारहाण केली गेली. मुलींना बसमधून खाली उतरुन त्यातीला एकाला दगडाने मारले असता दोघांनीही पळ काढला. ही घटना इराणी मार्केट बस थांबा ते फायनान्स चौक बस थांब्यापर्यंत घडली. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात २५ वर्षाच्या दोन अज्ञात तरुणांविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका १६ वर्षाच्या मुलीच्या आईने तक्रार दिली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रियंका देवकर करत आहेत. घरात शिरुन अत्याचाराचा प्रयत्न पंधरा वर्षीय मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रकार लोणीकंद येथे घडला. याप्रकरणी अशोक कुटे (३०, रा. अहमदनगर) याच्याविरुद्ध लोणीकंद पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक वंजारी करत आहेत. तीन शाळकरी मुलांवर गुन्हा एका १५ वर्षीय मुलीचे खासगी फोटो मागवून ते व्हायरल केल्याप्रकरणी १७ वर्षांच्या तीन मुलांवर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पॉक्सो, आयटी अॅक्ट आणि भारतीय न्याय दंड संहिता ७७ नुसार हा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पीडितेच्या अल्पवयीन बहिणीने तक्रार दिली आहे. पीडित आणि आरोपी हे शालेय विद्यार्थी असून एकमेकांच्या परिचयाचे आहेत. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे तपास करत आहेत.