रूमानी एन्टरटेन्मेंटच्या कलाकारांकडून 90च्या दशकातील गाण्यांचे सादरीकरण
गाजलेल्या गाण्यांनी नेले आठवणींच्या प्रांतात
पुणे – 90 च्या दशकातील शाहरूख खान-काजोल, गोविंदा-करिश्मा कपूर, माधुरी-सलमान खान, उर्मिला मातोंडकर आणि आमीर खान अशा लोकप्रिय जोड्यांवर चित्रित झालेल्या एकाहून एक बहारदार गाण्यांची सुरेल संध्याकाळ बुधवारी पुणेकरांना अनुभवायला मिळाली. अशा सरस गाण्यांना पुणेकरांचा मिळणारा प्रतिसाददेखील “देखा है पहली बार’ असाच होता. अशा “एव्हरग्रीन’ गाण्यांनी पुणेकरांची संध्याकाळ “रूमानी’ झाली होती.
भारतीय चित्रपट सृष्टीतील 90 च्या दशकातील संगीत तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आजही बहुतांश जणांच्या ओठांवर असणारी ही गाणी अजरामरच आहेत. याच सन 1990 च्या दशकातील हिंदी सिनेगीतांचा संगीत आणि नृत्याच्या आविष्काराने बुधवारची सायंकाळ रंगीन झाली. या कार्यक्रमामध्ये गायक मोहित थत्ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या कलाविष्काराने रसिक भारावून गेले. निमित्त होते, दै. “प्रभात’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “नारी सन्मान 2020′ या पुरस्कार सोहळ्यावेळी रुमानी एन्टरटेन्मेंटच्या कलाकारांनी सादर केलेल्या “90 एमएल-अनटोल्ड सागा ऑफ ऍन एव्हरग्रीन एरा’ हा गीतांच्या कार्यक्रमाचे.
या कार्यक्रमामध्ये “रूमानी एन्टरटेन्मेंट’च्या अपूर्वा चिपळूणकर, रिया देसाई, क्रिशा चिटणीस, सुवर्णा राठोड, केतन गोडबोले यांनी गायन आणि नृत्य सादर केले. या कार्यक्रमासाठी कुणाल फडके यांनी नृत्य दिग्दर्शन, प्रशांत कांबळे यांनी ध्वनियोजना, सुश्रुत जोशी यांनी प्रकाशयोजना, अबोली अभ्यंकर-थत्ते यांनी ट्रॅकचे आयोजन केले होते. तर कार्यक्रमाचे निवेदन प्रदीप फाटक यांनी केले.
सन 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘1942-अ लव्ह स्टोरी’ या चित्रपटातील “कुछ ना कहो, कुछ भी ना कहो’ या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. जॉन मॅथ्यू मॅथन यांच्या “सरफरोश’ या चित्रपटातील “जो हाल दिल का’ हे गीत सादर केले. सुपरहिट असणाऱ्या शाहरुख आणि काजोल या जोडीवर चित्रित झालेल्या “जाती हुं में, जल्दी है क्या’ या गाण्यावरील नृत्याने अधिकच बहार आणली.
“बस एक सनम चाहीए, आशिकी के लिए’, हे त्या काळातील तरुणाईचे ताईत बनलेले गाणे आणि त्यानंतर “तू मेरा हिरो नंबर 1′ आणि रंगीला चित्रपटातील “रंगीला रे’ गीतांवर उपस्थितांनी ठेका धरला.
हरिहरन, सुरेश वाडकर आणि विशाल भारद्वाज यांचे “चप्पा चप्पा चरखा चले’ या आजही हिट असलेल्या गाण्याने पूर्वार्धाचा समारोप झाला. उत्तरार्धात “विश्वात्मा’मधील “सात समुंदर पार में तेरे, पिछे पिछे आ गयी’ या गीताला रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट करून दाद दिली. तर “दिल से’ या चित्रपटातील “ए अजनबी’ हे गीत सादर केले. “अंदाज अपना अपना’ या चित्रपटांतील “ये रात और ये दुरी’ या गीताला रसिकांनी दाद दिली.
“साजन’ या चित्रपटातील माधुरी दीक्षित-सलमान खान यांच्यावर चित्रित झालेल्या “देखा है पहली बार’ या अजरामर गीताला भरभरून दाद मिळाली. दिग्दर्शक संजय लीला भन्साळींचा पहिला चित्रपट असणाऱ्या “खामोशी-द म्युझिकल’ या चित्रपटातील “बाहों के दरमियॉं’ या गीतावर सादर झालेल्या नृत्याने कार्यक्रमाला “चार चॉंद’ लावले. “ए काश के हम होश में अब आने ना पाये’ या गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली.
अभूतपूर्व…उत्स्फूर्त…हृद्य..! कर्तृत्ववान दामिनींचा ‘प्रभात’ने केला यथोचित गौरव
‘प्रभात’च्या सन्मानाने जबाबदारी वाढली