Devendra Fadnavis : विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाला कोणाचे नाव ? मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली घोषणा
Devendra Fadnavis : १,७६३ मीटर लांबीच्या एकात्मिक पुलामुळे पाषाण, बाणेर आणि औंध परिसरातील प्रवाशांना दिलासा; २७७ कोटींचा प्रकल्प कार्यान्वित.

Devendra Fadnavis – पायाभूत सुविधांच्या कमतरतेमुळे काही मोठ्या शहरांच्या विकासाची गती मंदावते. त्यामुळे पुणे शहराला वाहतूक कोंडी मुक्त करण्यास शासनाचे प्राधान्य आहे. पुण्यात रस्त्यांसाठी उपलब्ध जागा मर्यादित असल्याने उड्डाण पूल, ग्रेड सेपरेटर, भुयारी मार्ग आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विस्तार या माध्यमातून वाहतूक व्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे.
पुण्यात वाहतुकीसाठी जमिनीवर, आकाशात आणि जमिनीखाली अशा तिन्ही स्तरांवर एकाच वेळी काम सुरू असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या चौकातील एकात्मिक दुमजली उड्डाण पुलाचे लोकार्पण रविवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, उपमहापौर परशुराम वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. उपस्थित उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, की विद्यापीठ चौकातील जुना पूल पाडून नवीन दुमजली उड्डाण पूल उभारण्याचा निर्णय घेताना अनेक अडचणी आणि मतभेद होते. मात्र, सर्वांना विश्वासात घेऊन आणि विविध पक्षांच्या नेत्यांचे सहकार्य मिळवून हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केला. या प्रक्रियेत दिवंगत अजित दादांनी घेतलेला पुढाकार महत्त्वाचा होता, असे त्यांनी नमूद केले.
या प्रकल्पाच्या सुरुवातीच्या काळात नागरिकांनी टीका केली होती. मात्र, शहराच्या दीर्घकालीन हिताचा विचार करून हा निर्णय घेतला होता. यासंदर्भात अजितदादा एका भाषणात म्हणाले होते, आम्ही अभियंता नाही. मात्र, अभियंत्यांनी दिलेल्या आराखड्यानुसार प्रकल्प वेगाने पूर्ण करणे हे आमचे काम आहे, असे स्पष्टपणे सांगत हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, असेही फडणवीस म्हणाले.
मोहोळ म्हणाले, की पीएमआरडीएच्या माध्यमातून सुमारे २७७ कोटी रुपये खर्च करून १ हजार ७६३ मीटर लांबीचा हा उड्डाण पूल उभारला असून, शिवाजीनगर, औंध, बाणेर आणि पाषाण परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास त्याचा फायदा होईल.
मिसाळ म्हणाल्या, पुण्याच्या एकात्मिक विकासासाठी केंद्र सरकारकडून ८० हजार कोटी रुपये मिळाले असून, त्यामुळे येणाऱ्या काळात पुण्याचा चौफेर विकास होणार आहे. महापौर नागपुरे यांनी पुणे महानगराच्या विकासासाठी हा पूल महत्त्वाचा असल्याचे सांगितले.
अजितदादांचा पाठपुरावा
या प्रकल्पाच्या निमित्ताने अजितदादांची आठवण प्रकर्षाने होत असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, की विद्यापीठासमोरील जुना पूल वाहतुकीसाठी अपुरा ठरत असल्याने तो पाडण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. आधुनिक दुमजली उड्डाण पूल उभारण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. करोनाच्या कठीण काळातही पुणेकरांना कमीत कमी त्रास होईल, याची काळजी घेत हा प्रकल्प सुरू ठेवल्यामुळे तो विक्रमी वेगाने पूर्ण होऊ शकला.
उड्डाण पुलाला अजित पवार यांचे नाव
विद्यापीठासमोरील या उड्डाण पुलाला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव देण्याबाबत व्यक्त झालेल्या भावना मान्य असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस यांनी यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिली.






