Satara: जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा पेच
Satara जिल्हा बँकेची निवडणूक महायुती म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला. मात्र, जागावाटप आणि स्थानिक राजकीय संघर्षामुळे अनेक ठिकाणी मित्रपक्षांचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले. भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनीही आपापले राजकीय अस्तित्व दाखवून दिले आहे.

Satara: सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता अध्यक्षपदाच्या निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आहे. या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक नऊ जागा मिळवल्या असल्या, तरी महायुतीतच अध्यक्षपदाचा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाची एकजूट झाल्यास, अध्यक्षपदासाठी भाजपसमोर आव्हान असेल. त्यामुळे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या भूमिकांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
जिल्हा बँकेची निवडणूक महायुती म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला. मात्र, जागावाटप आणि स्थानिक राजकीय संघर्षामुळे अनेक ठिकाणी मित्रपक्षांचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले. भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनीही आपापले राजकीय अस्तित्व दाखवून दिले आहे. विशेष म्हणजे, जिल्हा परिषद आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय संघर्षाचे पडसाद बँकेच्या निवडणुकीतही उमटले.
या निवडणुकीत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी रणनीती आखून, आपले समर्थक संचालकपदी निवडून आणले. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची बिनविरोध निवड आणि स्वतःच्या गटाचे संख्याबळ वाढवण्यात त्यांना यश आले. त्यामुळे भाजपच्या अध्यक्षपदाच्या दाव्यासाठी मंत्री गोरे यांचे पाठबळ महत्त्वाचे ठरणार आहे. त्याचबरोबर भाजपमधील अन्य नेत्यांशी समन्वय साधण्याचे आव्हान गोरे यांच्यासमोर असेल. दुसरीकडे, पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण सोसायटी मतदारसंघात विजय मिळवला. महिला राखीवसह अन्य जागांवर शिवसेनेचे संचालक निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसनेही आठ जागा मिळवल्याने मंत्री मकरंद पाटील यांचीही भूमिका अध्यक्षपदाच्या गणितात महत्त्वाची ठरणार आहे. या दोन्ही नेत्यांनी एकत्र भूमिका घेतल्यास अध्यक्षपदाच्या निवडीत भाजपची कोंडी होऊ शकते.
दहा वर्षांच्या संचालकपदाच्या मर्यादेमुळे अनेक दिग्गज नेत्यांना यंदा बाहेर रहावे लागले. त्यामुळे नव्या नऊ चेहर्यांना संचालकपदी संधी मिळाली आहे. माजी मंत्री बाळासाहेब देसाई, विलासराव पाटील-उंडाळकर आणि किसन वीर यांचे राजकीय वारसही बँकेत दाखल झाले आहेत. त्यामुळे अध्यक्षपदाची निवड केवळ संख्याबळावर ठरणार की, नेत्यांच्या राजकीय प्रतिष्ठेहवर ठरणार, हा प्रश्न आहे. भाजपला अध्यक्षपद मिळवायचे असेल, तर मित्रपक्षांची नाराजी दूर करुन, एकमत घडवावे लागेल. त्याचबरोबर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला एकजूट कायम ठेवावी लागेल. त्यामुळे जिल्हा बँकेच्या सत्तेची सूत्रे कोणाच्या हाती जाणार, याची उत्सुकता आहे.
अध्यक्षपदाच्या गणितातील निर्णायक चेहरे
मंत्री जयकुमार गोरे : भाजपच्या अध्यक्षपदाच्या दाव्यासाठी संचालकांची मोट बांधण्याची जबाबदारी.
मंत्री शंभूराज देसाई : शिवसेनेचे चार संचालक निवडून आल्याने सत्तेच्या समीकरणात महत्त्वाचे स्थान.
मंत्री मकरंद पाटील : राष्ट्रवादीचे संख्याबळ, शिवसेनेशी समन्वय साधण्याची भूमिका निर्णायक.
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले : भाजपमधील समन्वय आणि वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करुन, अध्यक्षपदाचा मार्ग सुकर करण्याचे आव्हान.





