पुणे जिल्हा | आघाडीचा निर्णय मान्य असेल – पवार गट

नीरा, (वार्ताहर) – पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला संधी मिळावी अशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची भूमिका आहे. ही भूमिका आम्ही वरिष्ठांकडे मांडत आहोत.
मात्र वरिष्ठ जो निर्णय घेतील त्या निर्णया बरोबरच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील आणि पुरंदरची राष्ट्रवादी वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करेल, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे प्रवक्ते विजय कोलते यांनी स्पष्ट केले.
पुरंदर-हवेली विधानसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी अशी मागणी पुरंदर तालुक्यातील पवार गटाच्यावतीने केली जात आहे.
या मागणीसाठी माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांच्या नेतृत्वाखाली जयंत पाटील यांच्याकडे देखील पुरंदर तालुक्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी गेले होते.
त्यामुळे पुरंदर तालुक्यातील आघाडीमध्ये बिघाड होण्याची चिन्ह निर्माण झाली होती. तर काही पदाधिकार्यांनी पक्षाचा उमेदवार नसेल तर आम्ही राजीनामा देऊ, असा इशारा दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेससाठी पुरंदर-हवेलीची जागा मागणे हे आमचे काम आहे. आम्हाला संधी मिळाल्यास आम्ही त्याचे सोने करू; मात्र वरिष्ठांनी जर आघाडीचे काम करायचा आदेश दिला आणि त्यांनी दुसरा उमेदवार दिला तर आम्ही त्याच काम प्रामाणिकपणे करू असं पक्षाचे प्रवक्ते विजय कोलते यांनी स्पष्ट केला आहे.
कोलते म्हणाले की, पक्षाकडे उमेदवारी मागणे ही पक्षांतर्गत बाबत आहे. पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघाबाबत आघाडीतील वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो निर्णय सर्वांना मान्य असेल त्यांच्या सूचनेनुसार सर्वजण काम करतील.
2019मध्ये दिले होते आश्वासन
विधानसभा 2019 च्या निवडणुकीमध्ये आमदार संजय जगताप यांनी पुढच्या वेळी आपण तुम्हाला संधी देऊ अस आश्वासन दिले होत. शरद पवार यांच्या समोरच हे घडले होते.
त्यामुळे आमदार संजय जगताप यांनी आघाडी धर्म पाळावा व मला यावेळी संधी द्यावी, अशी मागणी संभाजी झेंडे यांनी केली आहे.
या मागणीला पवारगटामधून मोठा पाठिंबा मिळू लागला आहे. मात्र यामुळे आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये कटुता निर्माण होऊ लागली. त्यामुळे झेंडे यांना उमेदवारी दिली नाही तर पक्षचा राजीनामे देवू असा इशारा देण्यातपर्यंत कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत : माणिक झेंडे
आपल्या वरिष्ठांकडे उमेदवारी मागणे हे प्रत्येक कार्यकर्त्याच काम असते. प्रत्येक कार्यकर्ता संधी मिळण्यासाठी काम करत असतो. पुरंदरमध्ये देखील आमच्या पक्षाकडून वरिष्ठांकडे उमेदवारी मागितली जात आहे. मात्र आघाडीमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत. वरिष्ठांचा जो निर्णय होईल तो सर्वांना मान्य असेल.





