पुणे जिल्हा | पुरंदर-हवेलीत बंडखोरीची भीती!

सासवड, {अमोल बनकर} – पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघासाठी अनेक नेत्यांनी विधानसभेसाठी तयारी सुरू केली आहे. तर अनेक राजकीय पक्षाचे नेते सध्या नवनवीन संकल्पना वापरून प्रकाश झोतात राहण्यासाठी त्याचबरोबर मतदारांना आकर्षित करण्यासाठी महिलांसाठी यात्रा, उद्घाटने, भूमिपूजन समारंभ, धार्मिक समारंभ, सामाजिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी धडपड सुरू आहे.
तर यंदा पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीत बिघाडी होऊन बंडखोरी होण्याची भीती निर्माण झाली असली तरी निवडणूक घोषित झाल्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होणार असून तो पर्यंत राजकीय चर्चांना उधाण तर येणारच आहे.
पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघात सध्या काँग्रेसचे संजय जगताप हे आमदार आहे. त्यामुळे आघाडीत हा मतदार संघ काँग्रेसच्या वाट्याला जाण्याची शक्यता अधिक असली तरी पवार गटातून माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे हेही इच्छुक असल्याने झेंडे बंडोखोरी करणार की त्यांचे बंड शांत करण्यात पवार, खासदार सुप्रिया सुळे यांना यश येणार हे येणारा काळच सांगेल.
तर महायुतीत शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री विजय शिवतारे, भाजपकडून माजी आमदार अशोक टेकवडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदर कामठे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रा. दिगंबर दुर्गाडे व दत्ता झुरंगे इच्छुक असल्याने महायुतीत कोणी बंडखोरीकरून कुरघोडी करण्याचा प्रयत्न करणार की त्यांचे बंड पक्षाश्रेष्ठ थंड करून गपगार करणार, हे पाहणे औत्सुक्याचे आहे. त्यामुळे मतदारसंघ एक आणि इच्छुक अनेक अशी स्थिती झाली आहे.
हवेलीतील उमेदवार ठरला तर…
महायुतीत भाजपला हा मतदारसंघ हवा आहे. त्यामुळे इच्छुक आतापासूनच फिल्डींग लावून आहेत. या मतदारसंघात पुण्यातील शहरी भाग जोडला आहे.
त्यामुळे भाजपला मानणारा मोठा मतदार याभागात आहे. त्यामुळे भाजपने या मतदारसंघावर दावा केला असून भाजपकडून माजी आमदार अशोक टेकवडे, जालिंदर कामठे हे दोघेही इच्छुक आहेत.
दरम्यान, महायुती, महाविकास आघाडीतील आतापर्यंतचे इच्छुक हे पुरंदरमधीलच असून हवेली भागातून भाजपचे एकमवे जालिंदर कामठे इच्छुक आहेत. ते किंवा अन्य कोणी हवेली म्हणून उमेदवार म्हणून उभे राहिले तर पुरंदर विरुद्ध हवेली अशीच लढत रंगणाची चिन्हे अधिक आहेत.
शिवतारेंपुढे मोठे आव्हान
2009 मध्ये शिवसेनेचे विजय शिवतारे पुरंदरचे आमदार झाले. 2014 च्या निवडणुकीत सलग दुसर्यांदा ते विजयी झाले. 2019 च्या निवडणुकीत मात्र विजय शिवतारे यांचा पराभव झाला. काँग्रेसच्या संजय जगताप यांनी विजय मिळवला.
या निवडणुकीत संजय जगताप यांनी 31 हजार 400 मतांनी विजय मिळवला होता. तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही आघाडीला या मतदारसंघातून 35 हजाराचे मताधिक्य मिळाले आहे.
त्यामुळे शिवतारे यांच्या समोर हे लिड तोडण्याचे आव्हान असेल. काँग्रेसचे संजय जगताप आणि शिवसेना शिंदे गटाचे विजय शिवतारे हे जरी मतदार संघात कामाला लागले असले तरी इथे इच्छुक मोठ्या प्रमाणात आहेत.
एकेकाळी होता जनता दलाचा गड
पुरंदर-हवेली विधानसभा मतदार संघ हा एकेकाळी जनता दलाचा गड होता. जनता दलाचे दादा जाधवराव यांनी सर्वाधिक वेळा या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले.
पाच वेळा ते या मतदार संघातून विधानसभेवर निवडून गेले होते. त्या आधी 1962 आणि 1967 या दोन पंचवार्षिकमध्ये काँग्रेसच्या ज्ञानेश्वर खैरे यांनी पुरंदरचे प्रतिनिधीत्व केले होते.
1972 मध्ये समाजवादी पक्षाचे ज्योतीयाजीराव जाधवराव हे आमदार झाले. 1978 मध्ये दादा जाधवराव पुरंदरचे आमदार झाले.1980 साली झालेल्या निवडणुकीत त्यांचा संभाजीराव कुंजीर यांनी पराभव केला.
मात्र त्यानंतर झालेल्या 1985 ते 1999, सलग चार निवडणुका दादा जाधवराव यांनी जिंकल्या. मात्र, 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोकराव टेकवडे यांनी दादासाहेब जाधवराव यांचा पराभव केला होता.





