एलएलबीच्या प्रवेशासाठी यंदा कट ऑफ वाढणार

पुणे – राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) राबविण्यात येत असलेल्या पदवीनंतरच्या तीन वर्षाच्या विधी अभ्यासक्रमासाठी (एलएलबी) राज्यात प्रवेशाच्या सुमारे २० हजार ७४० जागा आहे तर या जागांसाठी तब्बल ५१ हजार ३३४ उमेदवारांची अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे यावर्षी एलएलबीसाठी उपलब्ध जागांपेक्षा अडीचपट अधिक अर्ज दाखल झाले आहेत. परिणामी, यावर्षी कट ऑफ वाढणार आहे.
मागील काही वर्षांमध्ये एलएलबी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढली आहे. नोकरी, उद्योग-व्यवसाय करीत अनेक जण उच्च शिक्षणाच्या माध्यमातून कायद्याचा अभ्यास करण्यासाठी एलएलबीच्या शिक्षणाचा पर्याय निवडत असल्याचे आढळून येते. एलएलबी करून त्यात नव्याने चांगले करिअर करण्याचा मार्ग बहुसंख्य उमेदवार स्विकारत असल्याचे आढळून येते.
एलएलबीच्या शिक्षणाचा वापर हा प्र्त्येक क्षेत्रात काही ना काही कारणास्तव व कामासाठी होतच असतो. राज्यभरातून एलएलबीच्या सीईटी परीक्षेसाठी ९४ हजार ५०६ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ७४ हजार ६२१ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली.
एलएलबीच्या महाविद्यालयांची संख्याही सतत वाढत चाललेली आहे. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यातील २०६ महाविद्यालयांनी नोंदणी केलेली आहे. या महाविद्यालयांच्या माध्यमातून सुमारे २० हजार ७४० एवढ्या प्रवेशाच्या जागा तूर्तास उपलब्ध झाल्या आहेत. प्रवेश क्षमतेपेक्षा उमेदवारांच्या अर्ज जास्त दाखल झाले आहेत. त्यामुळे प्रवेशासाठी उमेदवारांमध्ये चुरस निर्माण झाली आहे.
उद्या शेवटचा दिवस…
सीईटी सेलने एलएलबीच्या कॅप फेरीसाठी अर्ज भरण्यास ३० जूनला सुरूवात केली होती. त्याची मुदत सोमवारी (दि.२१) संपली. एलएलबीच्या अभ्यासक्रमासाठी एकूण ५७ हजार ८९२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी ५१ हजार ३३४ उमेदवारांनी सर्व माहिती मुदतीत भरली असल्याने हे अर्ज लॉक केले आहेत.
त्यातील ३७ हजार ६९५ उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली आहे. तर, ज्या उमेदवांरानी कागदपत्रांची पूर्तता केली नाही त्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. त्या उमेदवारांना कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी २५ जुलैपर्यंतचा कालावधी दिला आहे. त्यानंतर प्रवेशाची पुढील प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.





