Pune : प्रश्नोत्तरांवरील आक्षेपासाठी ३० मे पर्यंत मुदत; एलएलबी ३ वर्षे प्रवेश परीक्षा

पुणे : महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी) एलएलबी ३ वर्षे प्रवेश पूर्व परीक्षेतील (सीईटी) प्रश्न आणि उत्तरांवर आक्षेप नोंदवण्यासाठी ऑब्जेक्शन ट्रॅकर विद्यार्थ्यांच्या लाॅगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यानुसार उमेदवारांना २८ ते ३० मे या कालावधीत आपले आक्षेप नोंदवता येणार आहेत.
शैक्षणिक वर्षे २०२५-२६ साठी घेण्यात आलेल्या एलएलबी ३ वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेश पूर्वपरीक्षेतील उत्तरांवर आक्षेप नोंदविण्यासाठी उमेदवारांना सीईटी सेलचे अधिकृत संकेतस्थळ cetcell.mahacet.org वर जाऊन हरकती नोंदवता येणार आहेत. ३० मे नंतर ऑब्जेक्शन ट्रॅकर बंद केला जाणार असल्याचे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.
उमेदवारांना प्रति प्रश्न, प्रति आक्षेपासाठी लाॅगिनद्वारे ऑनलाइन पद्धतीने एक हजार रुपये शुल्क भरावे लागतील. आक्षेपावर तज्ज्ञ व्यक्तींचे अभिप्राय मागवून ते अंतिम मानले जातील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे





