Pune : अकरावीच्या कट ऑफमध्ये दीड टक्का वाढ

पुणे -ऑनलाइन अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीची गुणवत्ता यादी, कट ऑफ जाहीर झाला आहे. शहरातील नामांकित महाविद्यालयांतील कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखांचा कट ऑफ ९० टक्केच्या पुढे आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा कट ऑफमध्ये एक ते दीड टक्का वाढ झाली आहे. यामुळे नामांकित महाविद्यालयात प्रवेशासाठी चुरस कायम असल्याचे दिसते.
राज्य मंडळाने दहावीचा निकाल जाहीर केल्यानंतर यंदा अकरावी प्रवेशासाठी राज्यभर ऑनलाइन प्रक्रिया राबवली. ऑनलाइन प्रक्रियेत तांत्रिक अडचणी उद्भवल्याने पहिल्या फेरीची निवड यादी विलंबाने म्हणजे शनिवारी जाहीर झाली.
विज्ञान शाखेसाठी फर्गसन महाविद्यालयात खुल्या प्रवर्गासाठी अनुदानित तुकडीसाठी ९५.९ टक्के, स्वयंअर्थसहाय्यित तुकडीसाठी ९५.४ टक्के गुणांची गरज आहे.
लक्ष्मणराव आपटे कनिष्ठ महाविद्यालयात ९५.२ टक्के, तर महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालयात ९५ टक्के गुण आवश्यक आहेत. कला शाखेत फर्गसन महाविद्यालयात खुल्या प्रवर्गासाठी अनुदानित तुकडीसाठी ९६.४ टक्के, स्वयंअर्थसहाय्यित तुकडीसाठी ९४ टक्के असणे गरजेचे आहे.
स. प. महाविद्यालयात ९२.६ टक्के, तर सिम्बायोसिस कला आणि वाणिज्य महाविद्यालयात ९२ टक्के पात्रता गुण आहेत. वाणिज्य शाखेसाठी बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात खुल्या प्रवर्गासाठी अनुदानित तुकडीसाठी ९६.२ टक्के, स्वयंअर्थसहाय्यित तुकडीसाठी ९५.८ टक्के, सिम्बायोसिस कला आणि वाणिज्य महाविद्यालयात ९४ टक्के, गरवारे वाणिज्य महाविद्यालयात ९३.६ टक्के गुण आवश्यक असल्याचे दिसते.





