चेन्नई – ज्येष्ठ अभिनेते कमल हासन यांनी अभिनेते विजय यांना उद्देशून महत्वाची भूमिका मांडली. विजय यांच्या सभांना गर्दी होत आहे. मात्र, गर्दीचे पूर्ण रूपांतर मतांमध्ये होणार नाही, अशी टिप्पणी त्यांनी केली. हासन आणि विजय हे दोघेही तमिळनाडूच्या राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी अनुक्रमे मक्कल निधी मय्यम आणि तमीळगा वेत्री कळघम या पक्षांची स्थापना केली आहे. तमिळनाडूत पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीला ताकदीने आणि स्वबळावर सामोरे जाण्यास विजय सज्ज झाले आहेत. त्यांनी जनतेपर्यंत पोहचण्यासाठी राज्यव्यापी दौरा हाती घेतला आहे. त्या दौऱ्यावेळच्या सभांना मोठी गर्दी होत आहे. मात्र, गर्दी झाली म्हणजे मते मिळतीलच असे नव्हे, असे म्हणत इतर पक्ष विजय यांना लक्ष्य करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर, पत्रकारांनी हासन यांना विजय यांच्या सभांना होणारी गर्दी आणि टीकेविषयीचा प्रश्न विचारला. त्यावर गर्दीचे रूपांतर मतांमध्ये होईलच असे नाही या भूमिकेशी त्यांनी सहमती दर्शवली. संबंधित वास्तव सर्वच नेत्यांना लागू होते. त्याला मी आणि विजयही अपवाद नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.