घोड नदीवरील ‘म्हसे–अण्णापूर’ पुलाचे काम पाच वर्षांपासून रखडले

शिरूर: पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांना जोडणारा घोड नदीवरील अत्यंत महत्त्वाचा ‘म्हसे–अण्णापूर’ पूल मंजुरीनंतर पाच वर्षे उलटूनही अद्याप अपूर्णच आहे. ₹१०.२५ कोटींचा निधी मंजूर असलेल्या या प्रकल्पाचे २०२३ मध्ये उद्घाटन होऊनही काम ठप्प असल्याने नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
सध्या पुलाचे खांब व संरचना अर्धवट अवस्थेत असून, कामासाठी आणलेले लोखंडी साहित्य उघड्यावर पडून गंजत आहे. हे गंजलेले साहित्य भविष्यात वापरल्यास पुलाच्या मजबुतीवर आणि सार्वजनिक सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, कामाच्या ठिकाणी अनिवार्य असलेला माहिती फलकही (Project Board) लावण्यात आलेला नाही.
पूल नसल्याने विद्यार्थी, शेतकरी आणि रुग्णांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर संपर्क तुटत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर होते. खर्चवाढ करण्यासाठी जाणीवपूर्वक काम लांबवले जात असल्याचा संशयही स्थानिकांनी व्यक्त केला आहे.
आंदोलनाचा इशारा –
या प्रकरणाची तातडीने चौकशी करून काम पूर्ण करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संबंधित प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. काम सुरू न झाल्यास शिरूर तहसील कार्यालयासमोर नागरिकांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे डेप्युटी इंजिनिअर श्रीपाद बालशटवार यांनी सांगितले की, “मी नुकताच या कामाचा चार्ज घेतला आहे. अधिक पाणी व मुसळधार पावसामुळे कामास उशीर झाला. मात्र लवकरच पुलाचे काम पुन्हा सुरू करण्यात येईल.”




