Pankaja Munde : राज्य सरकार आणि नागरी प्रशासनाने मुंबईतील वायू प्रदूषणाविरुद्ध कारवाई तीव्र केली आहे. पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल शहरातील १,००० हून अधिक बांधकाम स्थळांना काम थांबवण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत, अशी माहीती राज्यमंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी विधानसभेत दिली आहे. जानेवारीपर्यंत शहरातील २,२२४ सक्रिय बांधकाम स्थळांपैकी १,९५२ स्थळांवर कमी किमतीचे हवा गुणवत्ता सेन्सर बसवले आहेत. तथापि, सेन्सर अभावामुळे केवळ १६ जानेवारी रोजी ६७८ प्रकल्पांचे काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले होते. अधिकृत आकडेवारीनुसार, ऑक्टोबर २०२५ ते जानेवारी २०२६ दरम्यान चालू असलेल्या स्वच्छ हवा उपक्रमाचा भाग म्हणून शहरात एकूण १,९८१ कारणे दाखवा नोटिसा आणि १,०४७ काम थांबवण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. प्रदूषण पातळीमुळे सार्वजनिक आरोग्य संकट निर्माण झाल्याच्या दाव्याचे मुंडे यांनी खंडन केले. बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) आणि नवी मुंबई महानगरपालिका (एनएमएमसी) यांच्या अहवालांचा हवाला देत मुंडे यांनी सांगितले की, समाधानकारक (५१-१००) आणि मध्यम(१०१-२००) श्रेणींमध्ये हवेची गुणवत्ता चढ-उतार होत आहे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसह असुरक्षित गटांमध्ये कोणतेही प्रतिकूल आरोग्य परिणाम नोंदवले गेले नाहीत. धूळ कमी करण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करणाऱ्या बांधकाम प्रकल्पांना प्रथम औपचारिक सूचना दिली जाते. त्यानंतर कारणे दाखवा नोटीस दिली जाते आणि नंतर जर त्यांनी पालन न केल्यास काम थांबवण्याचा आदेश दिला जात असल्याचा त्या म्हणाल्या. धूळीचा सामना करण्यासाठी सरकारने शहरातील १४,४०८ किलोमीटर रस्ते धुण्यासाठी १२६ पाण्याचे टँकर आणि २५ मिस्टिंग मशीनचा मोठा ताफा तैनात केला असल्याचे मंत्र्यांनी सांगितले.