Ravet : रावेत मस्के वस्ती मैदानावरील राडा-रोडा हटविण्यास सुरुवात
Ravet : लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रहिवाशांना श्वसनाच्या समस्या

Ravet : मस्के वस्ती परिसरातील मैदानावर मोठ्या प्रमाणात साचलेल्या बांधकाम कचरा आणि राडारोड्यामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाची व्यथा प्रभातने पर्यावरण विभागासमोर सातत्याने मांडली.
या पाठपुराव्याची दखल घेत प्रशासनाने मैदानावरील राडारोडा व बांधकाम वेस्ट हटविण्याची प्रक्रिया सुरू केली असून स्थानिक नागरिकांनी या प्रकरणी समाधान व्यक्त केले आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून मैदानावर टाकण्यात आलेल्या बांधकाम वेस्टमुळे परिसरात धुळीचे प्रमाण वाढले होते. यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रहिवाशांना श्वसनाच्या समस्या जाणवत होत्या.
तसेच राडारोड्याच्या ढिगार्यांमध्ये साप, घूस यांसारख्या सरपटणार्या प्राण्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मैदानाचे सौंदर्यही बाधित होत असल्याने नागरिकांकडून सातत्याने मैदान मोकळे करण्याची मागणी केली जात होती.
या समस्येबाबत प्रभातने नागरिकांच्या भावना आणि अडचणींना वाचा फोडत पर्यावरण विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. विभागाने नागरिकांचे समस्या जाणून घेत आवश्यक कार्यवाही सुरू करत मैदानावरील राडारोडा हटविण्याचे काम हाती घेतले आहे.
सध्या मैदान स्वच्छ करण्याचे काम सुरू असून भविष्यात या ठिकाणी पुन्हा बांधकाम वेस्ट टाकला जाणार नाही, यासाठी देखील उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी प्रशासन तसेच त्यांच्या समस्या प्रभावीपणे मांडणार्या प्रभातचे आभार व्यक्त केले आहेत.
नागरिकांच्या आरोग्याशी आणि सुरक्षिततेशी संबंधित हा प्रश्न मार्गी लागल्याने मस्के वस्ती परिसरात समाधानाचे वातावरण असून मैदान लवकरच स्वच्छ आणि सुशोभित स्वरूपात नागरिकांसाठी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
Satara: … तर माझा पहिला क्रमांक असेल नगराध्यक्ष अमोल मोहिते यांचे प्रत्युत्तर





