अमृतकण : सांगड घालताना

-अरुण गोखले
एका सत्संगात एका साधकाने विचारले, “महाराज! प्रपंच आणि परमार्थाची सांगड कशी घालायची?’ उत्तर देताना सद्गुरू पू. ज्ञाननाथ रानडे म्हणाले, “बाबांनो! आपल्याला मांडलेला संसार मोडता येत नाही, गुंतलेल्या प्रपंच्यातून बाहेर पडता येत नाही, तर तिकडे संतांची, सद्गुरूंची शिकवण आपल्याला परमार्थाकडे वळण्याची प्रेरणा देत असते. अशा वेळी खरोखरच या दोन्हीची सांगड कशी घालायची हा प्रश्न असतोच.
इथं एक गोष्ट नीट ध्यानात घ्यायला हवी की फक्त मी, माझे आणि माझ्या पुरताच विचार करणे हा “प्रपंच’ आणि दुसऱ्याचा विचार करणे, त्यांच्या भाव भावनांची कदर करणे. त्यांच्या सुख दु:खात सहभागी होणे. दुसऱ्याचे जीवन सुखी करण्यासाठी आपण प्रयत्न करणे तिथूनच आपली “परमार्था’ची वाटचाल चालू होते.
घरात नव्याने लग्न होऊन आलेल्या सूनेने सकाळी फक्त तिच्या किंवा त्या दोघां पुरताच चहा केला तर आपण त्यावर चटकन हीच प्रतिक्रिया देतो की, छे काय हे स्वार्थी, जरा म्हणून दुसऱ्याचा विचार करायला नको.
पण हेच जर तिने सर्वांसाठी चहा केला तर तिची ही कृती कौतुकास पात्र होते, खरं ना?
नाहीतरी ज्ञानदेव आपल्या हरिपाठाच्या अभंगात हेच सांगतात की-
न लगे सायास जावे वनांतरा। सुखे येतो घरा नारायण ।।
हा नारायण आपल्याला कळला पाहिजे. त्याला ओळखता यायला हवे. संसाराकडे पाठ फिरवून देव शोधत वनात जरी गेले तरी तिथेही माणसाच्या मूलभूत असणाऱ्या अन्न, वस्त्र आणि निवारा या गरजा भागविण्यासाठी अगदी डोंगर दरीत किंवा गुफेत तरी घर करावेच लागते. म्हणजे तिथेही प्रपंच मांडावाच लागतो. होय ना?
मग तसे जर आहे तर मांडलेल्या प्रपंच्यातून उठून जाण्यात काय अर्थ आहे? त्यापेक्षा आहे त्या घरातच राहा. मुलांनी मातृदेवो भव, पितृदेवो भव हे लक्षात घेऊन त्यांचे आज्ञापालन करा. त्यांना वंदन करा. घरच्या स्त्रीने अतिथी धर्माचे पालन करणे, सर्वांशी प्रेमाने वागणे, कोणालाही शब्द, कृतीने न दुखावणे हीच साधना. तुमच्या घरातली गृहलक्ष्मी पाहणे, नातवंडात देवाचे रूप शोधणे हेच आहे त्याचे दर्शन. या गोष्टी साध्य करणे हाच अभ्यास, आणि हीच आहे प्रपंच आणि परमार्थाची सांगड घालण्याची कला.’





