मध्यावधी निवडणूक नाही नवी दिल्ली, दि. 22 – जोवर मी पंतप्रधानपदी आहे, तोवर देशात मध्यावधी निवडणूक घेण्यात येणार नाही, असे मोरारजी देसाई यांनी जाहीर केले. गृहखात्याच्या संसदीय सल्लागार समितीच्या बैठकीत हा विषय निघाला होता. मध्यावधी निवडणूक होणार काय, अशी शंका एका सदस्याने व्यक्त केली होती. नियमानुसारच मार्क्स दिल्याचा खुलासा पुणे – एसएससी परीक्षेत दिले गेलेले मार्क नियमानुसार व योग्य रितीनेच दिले गेले असून त्यात बदल करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा खुलासा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव श्री र बोकील यांनी केला. देशात विनापरवाना साडेतीन लाखांवर रेडियो नवी दिल्ली – 1977 साली देशात 3,61, 381 रेडियो व ट्रॅन्झिस्टर विना परवाना असलेले आढळून आले. त्याचप्रमाणे 1993 टीव्ही सेटही विनापरवाना वापरात होते. गैरवापर करणारांकडून अनुक्रमे 22,38,991 व 33,386 रुपये दंड म्हणून वसूल करण्यात आले, असे दळणवळणमंत्री नरहरी प्रसाद साई यांनी लोकसभेत सांगितले. पुढील आठवड्यात पक्षबदल विरोधी बिल नवी दिल्ली – पक्षबदल विरोधी बिल व औद्योगिक संबंध बिल लोकसभेत पुढील आठवड्यात मांडण्यात येतील, असे मजूरमंत्री रवींद्र वर्मा यांनी लोकसभेत जाहीर केले.