air india plane crash : “केंद्र सरकारने मृतांच्या कुटूंबीयांना भरपाई द्यावी” – मल्लिकार्जुन खर्गे

अहमदाबाद – विमान दुर्घटनेबद्दल केंद्र सरकारने उत्तरदायित्व निश्चित करावे. तसेच, मृतांच्या कुटूंबीयांना आणि जखमींना आर्थिक भरपाई द्यावी, अशी मागणी कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी केली. अहमदाबादमध्ये विमान दुर्घटना घडलेल्या स्थळाला खर्गे यांनी भेट दिली.
तसेच, सरकारी रूग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमींची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. केंद्र किंवा राज्य सरकारने अद्याप कुठली आर्थिक भरपाई जाहीर केली नसल्याकडे पत्रकारांनी लक्ष वेधल्यावर खर्गे यांनी भूमिका मांडली. दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले.
तसेच, अशा प्रकारच्या दुर्घटनांना किरकोळीत काढले जाऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. शोकाकुल वातावरण असल्याने सध्याची वेळ चौकशीसंदर्भात कुठली मागणी करण्याची नाही. दुर्घटनाग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स प्राप्त झाला आहे.
त्याच्या छाननीतून निष्कर्ष समोर येऊ द्या. त्यानंतर आम्ही आवश्यकतेनुसार मागणी करू, असे खर्गे यांनी स्पष्ट केले. दुर्घटनास्थळाला दिलेल्या भेटीवेळी त्यांच्या समवेत शक्तिसिंह गोहील, मुकूल वासनिक आदी ज्येष्ठ कॉंग्रेस नेते होते.





