पिंपरी | थकबाकीदारांच्या सातबारा उतार्यावर बोजा चढणार

पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड महापालिकेचा करसंकलन विभाग अॅलर्ट मोडवर आला आहे. थकबाकीबाबत झालेल्या बैठकीत अनेक सूचना देण्यात आल्या आहेत.
यामध्ये पहिल्या टप्प्यात प्रशासन अधिकारी व क्षेत्रीय अधिकार्यांना येत्या दहा दिवसांमध्ये पाच लाखांहून अधिक थकबाकी असणार्या थकबाकीदारांचा सातबारा, प्रॉपर्टी कार्ड प्राप्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
याबरोबर, अधिकार्यांनी संबंधित तलाठ्यांना पत्रव्यवहार करुन येत्या दहा दिवसांत थकबाकीदारांच्या थकीत रकमेचा बोजा संबंधिताच्या सातबारा उतार्यावर चढविण्यात यावा, असे निर्देश कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी दिले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात निवासी, औद्योगिक, बिगर निवासी, मिश्र, मोकळी जमीन अशा 6 लाख 30 हजारांहून अधिक नोंदणीकृत मालमत्ता आहेत.
महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत या मालमत्ताधारकांकडून कर वसूल करण्यात येत आहे.
कर आकारणी व कर संकलन विभागाने सर्व मालमत्ताधारकांमधील थकबाकीदारांबाबत माहिती जमा केली असून सर्व प्रशासन अधिकारी व क्षेत्रीय अधिकार्यांना प्रथम थकबाकीदारांबाबत कारवाईच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीमध्ये सूचना देण्यात आल्या आहेत.
आतापर्यंत चालू वर्षी 3 लाख 72 हजार 667 मालमत्ताधारकांनी 507 कोटींच्या कराचा भरणा केला आहे. एकूण मालमत्ताधारकांकडून मागील वर्षीपर्यंतचा 725 कोटींचा थकीत कर बाकी असून आंशिक कर भरलेल्यांकडून 45.78 कोटींचा थकीत कर येणे बाकी आहे.
त्याचबरोबर, चालू वर्षीच्या मागणीपैकी 233 कोटींचा कर थकीत असून 84.8 कोटींचा कर आंशिक कर भरलेल्यांकडून येणे बाकी आहे.
यामध्ये शहरातील मालमत्ताधारकांमध्ये पाच लाखाहून अधिक रक्कम असलेल्या 2,022 थकबाकीदारांकडे तब्बल 280.68 कोटींचा कर थकीत आहे.
या थकीत मालमत्तांधारकांनी येत्या दहा दिवसांमध्ये आपल्या थकीत रकमेचा भरणा न केल्यास संबंधित मालमत्तांवर जप्तीची कारवाई सुरु करण्याच्या सूचना प्रशासन अधिकारी व क्षेत्रीय अधिकार्यांना देण्यात आल्या आहेत.
तिसर्या टप्प्यात जप्त मालमत्तांचा होणार लिलाव
येत्या काळामध्ये जे थकबाकीदार आपल्या थकीत कराचा भरणा करणार नाहीत. अशा थकबाकीदारांच्या मालमत्ता महापालिकेकडून जप्त केल्या जाणार आहेत.मालमत्ता जप्तीच्या मोहिमेत जप्त केलेल्या मालमत्तांचा महापालिका लिलाव करणार आहे.
त्यामुळे संबंधित थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त केल्यानंतर सदर मालमत्तांचा लिलाव करण्याच्या सूचना बैठकीमध्ये संबंधित क्षेत्रीय अधिकारी व प्रशासन अधिकार्यांना देण्यात आल्या.
थकबाकीदारांनी आपल्या कराचा त्वरीत भरणा करून सातबारा उतार्यावर थकीत रकमेचा बोजा दाखल करण्याची कारवाई, मालमत्ता जप्तीची व मालमत्ता लिलावाची कारवाई टाळावी.
कर जमा न करणार्या थकबाकीदारांवर यापुढे महानगरपालिका धडक मोहीम राबवून कर वसुली करणार आहे.- अविनाश शिंदे, सहाय्यक आयुक्त, कर आकारणी व कर संकलन विभाग, पिंपरी-चिंचवड
‘असा’ होणार ‘बोभाटा’
पाच लाखांहून अधिक थकबाकी असलेल्या थकबाकीदारांच्या नावाचा बोभाटा करण्यासाठी पालिका वेगवेगळ्या पर्यायांचा वापर करणार आहे.
यात पाच लाखांहून अधिक थकबाकी असलेल्या थकबाकीदारांची नावे वर्तमानपत्र, सोशल मीडियातून प्रसिद्ध केली जाणार आहेत. थकबाकीदारांच्या मालमत्तेसमोर स्पीकरद्वारे त्यांची नावे पुकारुन थकबाकी भरण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.





