मंथन : पर्यावरणावर विकासाचे ओझे!

-अॅड. गिरीश राऊत
विकासाच्या नावाखाली पर्यावरणाची हानी, हा राजकीय, सामान्य लोकांच्यादृष्टीने आज तितका गांभीर्याचा विषय नसल्याचे दिसत असले तरी आपण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेत आहोत, हे लक्षात घ्यावे. पर्यावरण, सृष्टी जगली तरच आपण जगणार आहोत, असा साधा हिशेब विकासाच्या ओझ्याखाली दबला गेला आहे.
समृद्धी महामार्गाप्रमाणे कोकणात द्रुतगती महामार्ग आणि सुमारे 12 नवी शहरे तयार करण्याच्या योजनेचा आराखडा नुकताच सादर करण्यात आला आणि त्या प्रकल्पास मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवल्याचे वृत्त प्रसारित झाले आहे. या कृतीचा स्थानिक शेतकरी, आदिवासी, मच्छीमारांवर, जीवसृष्टीवर आणि पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम होणार आहे.प्रशासनाने या योजना आधी जनतेकडे न्यायला हव्यात. त्याऐवजी, प्रसारमाध्यमे त्यांना हिरवा कंदील दाखवल्याची बातमी देतात, याचा अनिष्ट परिणाम ग्रामस्थांच्या मनावर होऊ शकतो. शेतकरी, शेती व देशासाठी अहिताच्या असलेल्या शेतीसंबंधी कायद्यांबाबत सध्या तेच घडत आहे.
कोकणातील द्रुतगती महामार्ग आणि नव्या शहरांचा प्रकल्प आणताना नेहमीप्रमाणे विकासाची जपमाळ ओढली जाते. विकासाला तर कुणाचाच विरोध नाही, असे वाक्य ठसवले जाते. परंतु या विकासाला सर्वत्र जीवसृष्टीचा आणि निसर्गाधारित जीवन जगणाऱ्या माणसांचा विरोध आहे. कोकणच्या माडांचा, आंबे- फणसांचा, खेकड्यांचा, कोळंबी- शेवंडांसह सर्व मत्स्यसृष्टीचा, मॅनग्रोव्हसह जंगलांचा, डोंगर व लाल काळ्या मातीचा, गवताळ सड्यांचा, जांभा आणि बेसॉल्ट खडकांचा, निळ्याशार नद्या आणि सागराचा, त्यातील जीवांचा, या प्रकल्पांना कडाडून विरोध आहे. त्यांच्यापुढे प्रकल्प करणाऱ्यांची संख्या नाही म्हणावी इतकी नगण्य आहे. पण ते बाधित बोलू शकत नाहीत. मूकपणे एकामागून एका प्रदेशात तुमच्या विकासामुळे ते नष्ट होत आहेत. पण त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने मानवी अस्तित्वच धोक्यात येत आहे.
पुनर्वसन करून आणि नुकसानभरपाई देऊन प्रकल्प पूर्ण करायचे, हा सत्ताधाऱ्यांनी अवलंबलेला मार्ग दिसत आहे. तुमच्या निर्णयामुळे निसर्गावर, जीवसृष्टीवर आणि तिच्या लेकरांवर तुम्ही आघात कसा करू शकता?पण राजकारणी आणि आधुनिक माणसे असा विचार करू शकत नाहीत. स्वयंचलित यंत्र आल्यावर 250 वर्षांत निर्माण केल्या गेलेल्या कृत्रिम व्यवस्थेने नैसर्गिक शाश्वत व्यवस्थेला मागास व अव्यावहारिक ठरवले आहे. त्याचा हा मानसिक परिणाम आहे. त्यामुळे आपण विकृतीला प्रकृती मानू लागलो आहोत आणि आपल्या हाताने आपला नाश करत आहोत.
छत्रपती शिवाजी महाराज “श्रीं’च्या, महात्मा फुले “निर्मिका’च्या, स्वामी विवेकानंद विश्वव्यापी तत्त्वाच्या, म. गांधी सत्यरूपी ईश्वराच्या इच्छेप्रमाणे जगले. त्यांना स्वतःच्या इच्छा नव्हत्या. ते भौतिक सुख-समृद्धीच्या विरोधात होते. पण आताच्या माणसाला स्वतःच्या अमर्याद ऐहिक इच्छा आहेत आणि यांच्या इच्छा हे, तथाकथित आधुनिक जनतेच्या इच्छांचे मोठे प्रतिबिंब आहे. काही काळ जीवनाची देणगी मिळालेल्या यांच्या मनाचा हा खेळ आहे. यासाठी ही देणगी देणाऱ्या पृथ्वीने आणि जीवसृष्टीने कायमस्वरूपी का उद्ध्वस्त व्हावे, हा खरा प्रश्न आहे.
निसर्गाला नैसर्गिक उपभोग मान्य आहे. अनैसर्गिक उपभोगवाद मान्य नाही. अवकाळी, बर्फवृष्टी, वादळे, उष्णतेच्या लाटा, तेच सांगत आहेत. मानवजात व जीवसृष्टी वाचवण्यासाठी हा विकास तत्काळ थांबवण्यास विज्ञान सांगत आहे. पण महत्त्वाकांक्षा, स्वार्थ, कर्तृत्वाच्या कल्पना, सुखोपभोगांच्या धुंदीत माणसे बेभान झाली आहेत. आपले हजारो वर्षांपासूनचे साधे शाश्वत जीवन त्यांना अज्ञानामुळे आता मागासपणाचे व अप्रतिष्ठित वाटू लागले आहे. ते विचार करणाऱ्या मानवप्राण्यांमध्ये गणले जातात. परंतु ते प्रत्यक्षात घोर अविचार करत आहेत.
पृथ्वीवर सुमारे 410 कोटी वर्षांपूर्वी प्रथम, आदीम एकपेशीय जीवाच्या रूपात जीवनाचा आविष्कार झाला. जीवन विकसित होत आताच्या स्थितीत येण्यास एवढा प्रदीर्घ काळ लागला. हा खरा विकास. प्रकल्प जे घडवत आहे ती एक पृथ्वीच्या आणि जीवनाच्या विरोधात जाणारी जीवनशैली आहे. पॅरिस करारातील मानवजात वाचवण्यासाठी उद्योगपूर्व काळाच्या तुलनेतील 2 अंश सेल्सियसची सरासरी तापमानातील वाढ गेल्या वर्षी सन 2020 च्या ऑगस्ट महिन्यातच झाली, याचे गांभीर्य आपण समजून घेणार आहोत की नाही?
गतवर्षी मार्च ते मे 2020 या तीन महिन्यांत महाराष्ट्रात 660 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आधी औद्योगीकरणाचा भाग असलेल्या रासायनिक-यांत्रिक शेतीतील उत्पादनखर्चामुळे आत्महत्या होत होत्या. आता त्यात औद्योगीकरणानेच घडवलेल्या तापमानवाढ आणि हवामान बदलाची भर पडली आहे. कार्बन डायऑक्साइड, मिथेन, नायट्रोजन ऑक्साइड यांच्या वाढत्या उत्सर्जनामुळे डोंगर व त्यावरील जंगल नष्ट होताहेत, नद्या प्रदूषित होतात, सुकताहेत आणि सागर बुजवले जाताहेत. प्रकल्पांसाठी डोंगर तोडले जात असल्याने कार्बन शोषणाऱ्या व प्रदूषणाला आणि विषाणूंना निष्प्रभ करणाऱ्या हरितद्रव्याचा अविरत नाश होत आहे.
क्षणिक भौतिक सुख देणारा विकास आणि शाश्वत जीवन, एकाच वेळी मिळणे शक्य नाही. भौतिक सुख देणारे मोटार, वीज आणि सिमेंट या गोष्टी सुमारे 94 टक्के कार्बन उत्सर्जनास जबाबदार आहेत. यामुळे होणाऱ्या तापमानवाढ व हवामान बदलाची प्रक्रिया आता अपरिवर्तनीय झाली आहे, हे जागतिक हवामान संघटनेने जाहीर केले आहे. उच्चतम तापमान दरवर्षी पृथ्वीवर जागोजागी (नागपूर, दिल्ली, राजस्थान) मानवी शरीर जिवंत राहण्याची 50 अंश सेल्सियस ही मर्यादा ओलांडत आहे. या गतीने फक्त 30 ते 40 वर्षांत मानवजातीचे पृथ्वीवरून उच्चाटन होईल. ही प्रक्रिया सुरू झाली आहे.
हरितद्रव्यरूपी जीवांनी कोट्यवधी वर्षांच्या परिश्रमाने आपल्याला दिलेल्या अस्तित्वापेक्षा अर्थव्यवस्था महत्त्वाची नाही. कोकणाने महाराष्ट्राला आणि जगाला दिशा द्यावी. नाणार प्रकल्पाला विरोध करणाऱ्या नाणार गावाने 15 ऑगस्ट 2017 या स्वातंत्र्यदिनी तापमानवाढ व हवामान बदलाच्या मुद्द्यावर केलेला ठराव, या दृष्टीने जगाला मार्गदर्शक आहे.





