Maharashtra Budget 2024 : ‘अर्थसंकल्प कुठेही फुटलेला नाही…’ – अजित पवार

Maharashtra Budget 2024 – अर्थसंकल्पापूर्वी काही बातम्या वर्तमानपत्र आणि माध्यमांमध्ये आल्या म्हणजे अर्थसंकल्प फुटला असे म्हणता येणार नाही. तसे म्हटल्यास ते माध्यमांवर अन्याय करणारे आहे. तसेच हा अर्थसंकल्प कुठेही फुटलेला नाही. त्याची गोपनीयता पूर्णपणे राखली गेली आहे. त्यामुळे असे काहीही झालेले नाही. पण हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना बळ देणारा आणि महिलांना सशक्त करणारा आहे, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
शुक्रवारी (ता. 28 जून) अजित पवार यांनी अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात चर्चा करण्यात आली. विरोधक आणि सत्ताधारी अशा दोन्ही बाजूतील सदस्यांकडून यावर चर्चा करण्यात आली. तब्बल 70 सदस्यांनी या अर्थसंकल्पावर आपले मत व्यक्त केले. यावर अजित पवार यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिले.
अजित पवार म्हणाले, भाषणाच्या सुरुवातीलाच मी एक गोष्ट स्पष्ट करतो. अर्थसंकल्प फुटल्यासंदर्भात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि जयंत पाटील यांनी विधान केले. हे दोन्ही सदस्य अतिशय ज्येष्ठ आहेत. अर्थसंकल्पापूर्वी वर्तमानपत्रात अर्थसंकल्पातील तरतुदी छापून आल्याबाबत त्यांनी आक्षेप घेतला.
जयंत पाटील यांनी तर नऊ वेळा अर्थमंत्रालयाची जबाबदारी सांभाळली आहे. अर्थसंकल्पाकडून नागरिकांच्या काही अपेक्षा असतात. या अपेक्षांचा कानोसा घेऊन माध्यमांमध्ये त्यावर चर्चा होत असते. त्यासंदर्भातल्या बातम्या छापल्या जात असतात. लोकांच्या अपेक्षांचे प्रतिबिंब त्यात दिसत असते, असे त्यांनी स्पष्ट केले.
फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्प मांडला जातो. केंद्राने अर्थसंकल्प मांडला की राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येतो. हा अर्थसंकल्प सादर करत असताना सरकारने जाणीवपूर्वक सर्वांचा विचार केला. राज्यातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. आर्थिक शिस्त पाळली जावी, हा सरकारकडून प्रयत्न करण्यात आला आहे, असे यावेळी अजित पवार यांनी अर्थसंकल्पावरील उत्तर देताना विधानसभेत माहिती दिली.





