Satara : पारंगे चौक बनतोय मृत्यूचा सापळा

कृष्णानगर : पारंगे चौक येथे रस्ता रुंदीकरणामुळे वाहनांचा वेग प्रचंड वाढला असल्याने मोठ्या अपघातची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सातारा नगरपरिषदेने योग्य ती खबरदारी घेऊन या रस्त्यावर सहा ते सात रबरी रंबलर (गतीरोधक) बसवण्याची गरज आहे.
पारंगे चौक अत्यंत वर्दळीचा आहे. या परिसरात महाराष्ट्र शासनाची प्रशासकीय इमारत भारतीय स्टेट बँक तसेच अनेक नामांकित हॉस्पिटल व क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय याचा समावेश आहे. जुन्या आरटीओ कडून पोवईनाका येथे जाणारी तसेच एसटी स्टँड करून सिव्हिल हॉस्पिटलकडे जाणारी वाहने ज्यामध्ये दुचाकी, कार, एसटी बसेस त्याचबरोबर ॲम्बुलन्स ची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते.
या दोन्ही रस्त्यांना चौकापर्यंत एकही दुसरा रस्ता मिळत नसल्याने वाहनांना पारंगे चौकापर्यंत कोणताच अडथळा नसल्याने वाहनचालक अत्यंत वेगाने चौकापर्यंत येतात व त्याच वेगाने चौक क्रॉस करतात. त्याचबरोबर बहुतांशी अवजड वाहने, एसटी बसेस पोवईनाक्याकडून अत्यंत तीव्र वेगाने या रस्त्याने मार्गक्रमण करत असतात. छोटे मोठे दुचाकीचे अपघात, वाहनांची घासाघासी अशी किरकोळ प्रकार कायम घडत असतात. या चौकामध्ये स्टेट बँकेनजीक चौक असल्याने ४ पांढरे पट्टे मारले आहेत. याखेरीज कोणतीच काळजी सातारा नगरपरिषदेने घेतलेली दिसून येत नाही.
सदर चौकात चारही बाजूला सहा ते सात रबरी रंबलर बसवणे अत्यंत गरजेचे आहे, तरच वाहनांचा वेग मंदावेल. त्याचबरोबर चारही बाजूला आरसे लावल्यास वाहनचालक सतर्क होतील. संभाव्य धोका लक्षात घेता सातारा नगरपरिषदेने लवकरात लवकर पावले उचलावीत, अन्यथा गंभीर अपघात घडल्यास अथवा कोणी मृत्युमुखी पडल्यास बैल गेला आणि झोपा केला अशी वेळ सातारा नगरपरिषदेवर येऊ नये.





