“धनधान्य देणारी काळी आई ही खरे शक्तिपीठ” – बच्चू कडू

अमरावती – धनधान्य देणारी काळी आई ही खरे शक्तिपीठ आहे. आणि तिच्यासाठी राबणाऱ्या शेतकऱ्याला न्यायाचा महामार्ग खुला करून देणे हे शासनाचे आद्य कर्तव्य आहे. ८५ हजार कोटीचा महामार्ग आम्ही मागितला नाही. तो आमच्यावर थोपवू नये.
कर्जमाफीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत काहींचे खिसे भरण्यावर भर देण्याची आवश्यकता नाही. आधी भूमीरूपी खऱ्या शक्तिपीठाचे रक्षण महत्वाचे आहे आणि म्हणूनच शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या सर्व संघटनांना आमचा पाठिंबा आहे, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारने २० हजार कोटी रुपयांची तरतूद करून महामार्ग पुढे रेटण्याचा प्रयत्न सुरू केला असतानाच शक्तिपीठ महामार्ग संघर्ष समिती आक्रमक झाली असून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे.
याच पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. महामार्ग बांधण्याआधी खऱ्या शक्तिपीठाचे जागरण करा, असा टोला बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.
बच्चू कडू यांनी समाज माध्यमांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे व्यंगचित्र देखील प्रसारीत केले आहे. या व्यंगचित्राची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे.
सध्या राज्यात शक्तिपीठ महामार्गावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले आहेत. विरोधकांनी शक्तिपीठ महामार्गाला कडाडून विरोध केला आहे. शेतकऱ्यांचे नुकसान करणारा हा महामार्ग नको अशी भूमिका शेतकऱ्यांसह विरोधकांनी घेतली आहे.





