नवाब मलिकांच्या कन्येचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाल्या भाजपने…

मुंबई – आपले वडिल विधानसभेच्या अधिवेशनात भाजपचे बिंग फोडणार होते, भाजपच्या कोणत्या नेत्यांचे कोणत्या गुन्हेगाराबरोबर संबंध आहेत याची माहिती ते देणार होते म्हणूनच त्यांना अधिवेशनापुर्वी खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे, असा दावा मलिक यांच्या कन्या सना मलिक यांनी ट्विटरवर केला आहे.
त्यांनी आपल्या वडिलांच्या 2 डिसेंबरच्या वक्तव्याचा व्हिडीओही यात टाकला आहे. त्यात नवाब मलिक जो खरा हायड्रोजन बॉम्ब फोडणार होते तो अजून त्यांनी तसाच ठेवला आहे असे त्यांनी नमूद केले आहे. भाजप नेत्यांच्या संबंधात आपल्याकडे जी माहिती आहे ती माहिती आपण विधानसभेत बाहेर काढू आणि ती बाहेर काढल्यानंतर भाजप नेत्यांना तोंड दाखवण्यास जागा मिळणार नाही असेही मलिक यांनी म्हटले होते.
त्याच्या आतच त्यांना अटक झाली आहे त्यामुळे तो विषय अजून बाहेर यायचा बाकी आहे असा इशाराही सना मलिक यांनी दिला आहे. सत्य हे सुर्यासारखं असतं, माझे वडिल सत्य बाहेर काढणार होते म्हणून त्यांना अटक झाली आहे असेही त्यांनी म्हटले आहे.





