पुणे : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी १५०० पानांचे दोषारोपत्र दाखल करण्यात आले आहे. या दोषारोपपत्रातून अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा सुत्रधार वाल्मिक कराडच असल्याचे दोषारोपपत्रात सांगितले आहे. याबाबत राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी भाष्य केलं आहे. त्या म्हणाल्या दाखल केलेल्या दोषारोपात्रात काय लिहिले तुम्ही वाचेल का? त्यात काय लिहिले आहे, ते मला माहीत नाही. तुमच्यावर कोर्ट ऑफ कन्टेट दाखल होईल. बीडचा विषय मागे पडला आहे. तुम्हाला टार्गेट दिले आहे, ते प्रश्न तुम्ही विचारत आहे. मी पुण्यात आहे. पुण्याचे प्रश्न विचारा, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. काय म्हणाल्या पंकजा मुंडे? पंकजा मुंडे म्हणाल्या, सरपंच संतोष देशमुख प्रकरणाची मला माहिती नाही. हे सगळे गृह खात्याकडे असते. त्यांना माहिती असेल. संतोष देशमुख यांच्या हत्येचा मी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. त्याची वेगळी चौकशी करावी, अशी मी मागणी केली आहे. या प्रकरणातील सखोल माहिती माझ्याकडे नाही. तसेच या विषयावर बोलण्याची माझी जबाबदारी नाही. माझ्याकडे गृहखाते नाही. गृहखाते आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणीस या प्रकरणी लक्ष घालून आहेत. दोषींवर नक्की कारवाई होईल. हे प्रकरण संवेदनशील आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे. जलदगतीने चौकशी झाली पाहिजे. आरोपीला शिक्षा द्यावी हे मी आधीच बोलले आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. मी पुण्यात आले आहे, पुण्यातले प्रश्न विचारा बीडच्या गुन्हेगारीबाबत प्रश्न विचारला असता ‘तो विषय आता मागे पडला आहे. मी आता पुण्यामध्ये आहे. पुण्यामध्ये महिलेवर स्वारगेट एसटी स्टँडमध्ये बलात्कार झाला आहे. मला तो प्रश्न विचारा मी पुण्यात आलेली आहे. तर मला बीडचे प्रश्न का विचारतात. नांदेडमध्ये काल अत्याचाराचा प्रकार घडला. संपूर्ण राज्यात असे प्रकार घडत आहेत, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी संताप व्यक्त केला. पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर टीका सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या, पंकजा मुंडे यांचे वक्तव्य ऐकून मला धक्का बसला. त्या म्हणतात मी पुण्यात आलीये तर इथले प्रश्न विचारा? बीडवर नको. तुम्ही बीडच्या आहात. परळीमध्ये आहात. मग तुम्हालाच तेथील प्रश्न विचारणार ना? तुम्ही अमेरिकेत गेलात तर आम्ही तुम्हाला ट्रम्पवर विचारायचे का? असा टोला अंजली दमानिया यांनी लगावला. आरोपपत्रात नेमकं काय? सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार वाल्मीक कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहे. असं आरोपपत्रात म्हंटल आहे. आवादा कंपनीला खंडणी मागितल्याच्या वादामधून संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचं या आरोप पत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे, खंडणी, ॲट्रॉसिटी, हत्या या तिन्ही घटनांचा आरोप पत्रात एकत्रित उल्लेख केला आहे. 29 नोव्हेंबरला सुदर्शन घुलेच्या फोनवरून वाल्मीक कराडने खंडणी मागितली होती, आणि सहा तारखेला संतोष देशमुख यांचा सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि सांगळे यांच्यासोबत वाद झाला होता असे या आरोप पत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे. तर वाल्मिक कराडच्या विरोधातील सर्व पुरावे पाच गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानुसार त्याच्या विरोधामध्ये पोलिसांनी सर्व पुरावे गोळा केलेले आहेत.