Pune District : जागातिक स्तरावर वारकरी संप्रदयाची पताका
Pune District : या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वारकरी परंपरेचा, संतांच्या विचारांचा आणि साहित्याचा संदेश जागतिक स्तरावर पोहोचवण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

आळंदी : संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज यांचे ७५० वे जयंती वर्ष आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या ४५० व्या वैकुंठगमन सोहळ्याचे औचित्य साधून जर्मनीमध्ये भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वारकरी परंपरेचा, संतांच्या विचारांचा आणि साहित्याचा संदेश जागतिक स्तरावर पोहोचवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. जर्मनीतील खिसचेम येथील श्रीभगवान विठ्ठलाच्या मंदिरात हा ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे.
हा सोहळा १९ एप्रिल २०२६ रोजी अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमासाठी देहू आणि आळंदी येथील संस्थानचे विश्वस्त तसेच वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी १६ एप्रिल रोजी जर्मनीकडे रवाना होणार आहेत. १९ एप्रिल रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत प्रसिद्ध कीर्तनकार आणि अभ्यासक डॉ. भावार्थ रामचंद्र देखणे यांचे इंग्रजी भाषेत विशेष कीर्तन होणार आहे. त्यानंतर दुपारी १२ ते १२.३० या वेळेत दोन्ही संतांच्या मूर्तींची विधीवत प्राणप्रतिष्ठा केली जाईल.
या गौरवशाली दिनानिमित्त मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन तसेच ‘नमो ज्ञानेश्वरा’ हा विशेष कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. परदेशातील भारतीय समुदायाला आणि जागतिक नागरिकांना संत साहित्याची ओळख करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
या ऐतिहासिक सोहळ्यामुळे वारकरी संप्रदायाचा ध्वज सातासमुद्रापार फडकला असून, आयोजकांनी याबद्दल मोठा आनंद आणि विश्वास व्यक्त केला आहे.
हेही वाचा : Pune District : पिसर्वेत शाळेच्या मैदानावर बुलडोझर; विरोध डावलून आरोग्य केंद्राचे काम सुरु





