पुणे जिल्हा | अपेक्षांच्या ओझ्यात वयाचे अंतर वाढले

राहू, {भाऊ ठाकूर} – १९९० च्या दशकात स्त्रीभ्रूण हत्या, स्त्री- पुरूष यांच्यातील असमानता, आदी कारणामुळे मुलींची संख्या घटत गेली. त्याचे परिणाम हे २००५ नंतर दिसू लागले आहेत. शिक्षणाच्या विस्तारलेल्या कक्षा, भौतिक सुविधांची गरज आदी कारणांतून विवाह सोहळ्यातील रेशीमगाठी जुळण्यास अडचण येत आहे. त्यामुळे विवाहोच्छुक वधू- वरांचे वयाचे अंतर वाढले लागले आहे.
सध्या विवाहासाठी तरुण मुला- मुलींमध्ये जन्मदराचा मोठा फरक आहे. त्यामुळे लग्न जमविण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. परंतु मुलींचे सुरू असलेले शिक्षण देखील लग्न न जुळण्यास कारणीभूत आहे. सध्या मुलींचे शिक्षणाचे प्रमाण जादा आहे. उच्च शिक्षणाचे प्रमाण देखील आहे. ही अभिमानास्पद बाब आहे.
परंतु याचा परिणाम लग्न जमविण्यावर देखील होत आहे. मुली या उपजत हुशार असतात. त्यांना कौटुंबिक किंवा सामाजिक प्रोत्साहन मिळत असेल तर त्या सरकारी किंवा खासगी क्षेत्रात मोठ्या पदावर काम करतात. परंतु त्यांच्या पगाराबरोबर वय देखील वाढत आहे. याचाच परिणाम विवाह संस्थांवर होत आहे.
वय वाढल्यामुळे त्यांना त्या वयाचा योग्य जोडीदार मिळण्यास अडचणी येत आहेत. नोकरीवर तसेच उच्च पदावर काम करीत असताना त्यांना असलेला पगार देखील काही अंशी अडसर ठरत आहे. मुलींचा पगार वीस हजार असेल तर मुलाचा पगार हा कमीत कमी तीस हजार असणे अपेक्षित आहे. परंतु मुलींचे पगार व पोस्ट या मोठ्या असल्यामुळे मुलांमध्ये किंवा कुटुंबीयांमध्ये एक कमीपणाची भावना निर्माण होत आहे.
मुलींच्या कुटुंबीयांकडून अवास्तव अपेक्षा
लग्नासाठी मुली कमी आहेत, अशा प्रचारामुळे अनेक मुलींच्या कुटुंबीयांकडून अवास्तव अपेक्षा बोलून दाखविल्या जात आहेत. मुलाला चांगली नोकरी,बंगला, चारचाकी, तसेच जमीन देखील पाहिजे. या अपेक्षा प्रत्येक मुलाकडून किंवा कुटुंबीयांकडून पूर्ण होणे शक्य नाही.
या अपेक्षा ठेवताना मुलीच्या आई वडिलांनी आपली काय स्थिती आहे. याचा विचार केला पाहिजे. आपणाला देखील एक मुलगा आहे, त्याला देखील अशा परिस्थितीला तोंड द्यावे लागणार आहे, याचा विचार केला जात नाही.
वयाचा मोठा फरक
मुलींना शिक्षण पूर्ण करून व नोकरी मिळेपर्यंत मुलींचे वय वाढत जाते. तसेच वाढलेल्या वयाच्या बरोबरीचा मुलगा मिळणे अवघड होते. असा एखादा मुलगा मिळाला तर त्याला नोकरी नसते. त्यामुळे अशा अडचणीत भर पडत आहे.
आंतरजातीय विवाहात वाढ
समाजातील मुलींचा वाढता सहभाग व उच्च राहणीमान आदी कारणामुळे मुली समाजात ताठ मानेने वावरत आहेत. त्यांच्या अनुरूप स्वजातीय मुले न मिळाल्यामुळे उच्च शिक्षित मुलींमध्ये आंतरजातीय विवाहांचे प्रमाण वाढत आहे. शासनाने आंतरजातीय विवाहासाठी प्रोत्साहन दिले असले तरी समाज किंवा कुटुंबीयांना हे स्वीकारणे जड जात आहे.





