पुणे जिल्हा | राहूमध्ये रेशनिंग लाभार्थ्यांची फसवणूक

राहू, (वार्ताहर)- दौंड तालुक्यातील राहू येथे रेशनिंग लाभार्थ्यांची फसवणूक होत आहे. संबंधित दुकानदारांची चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकारी अक्षय शिंदे यांनी दौंडचे तहसीलदार यांना निवेदन देऊन केली.
निवेदनात आहे म्हटले आहे की, पी. ए. भटेवरा ही एकच व्यक्ती दोन रेशन दुकान चालवत आहे. लाभार्थ्यांना पावत्या न देणे, रेशन धारकांना मंजूर असलेले धान्य न देणे आदी प्रकार चालू आहे. एखाद्या महिलेचे लग्न झाले असेल तर त्या कुटुंबाचे त्या व्यक्तीपुरते धान्य लगेच कपात केले जात आहे.
परंतु वस्तुस्थितीमध्ये ती महिला जरी लग्न होऊन सासरी गेली तरी तिचे सासरी नाव रेशनवर लागले नसल्यामुळे व ऑनलाइन तिची मंजुरी असल्यामुळे त्या कुटुंबांना ते धान्य मिळणे गरजेचे आहे. परंतु त्यांच्या पातळीवरच ऑफलाइन नावाला काट मारून तेवढे धान्य कमी दिले जात आहे.
मयत झालेल्या व्यक्तींची नावे दहा दहा वर्षे कमी न करता ऑनलाइन नावे तशीच ठेवून कोटा शासनाकडून मिळविला जात आहे. परंतु लाभार्थ्यांच्या कुंपनावर पेनाने नावे कमी करून तेवढे धान्य लाभार्थ्यांना कमी दिले जात आहे.
आम्हाला कमी धान्य येते. वाहनातून माल दहा ते पंधरा पोती सांडल्यामुळे आम्ही तुम्हाला धान्य देऊ शकत नाही. त्याची चौकशी करण्याची मागणी शिंदे यांनी केली आहे.
अक्षय शिंदे यांचे निवेदन प्राप्त झाले असून संबंधित विभागाकडून या दुकानाची तपासणी लवकरच करणार आहे. – अरुण शेलार, तहसीलदार, दौंड.
तक्रारींसंदर्भात मला माहिती मिळाली आहे. जी कायदेशीर बाब असेल त्याला मी पूर्ण सहकार्य करणार आहे. माझ्याकडून कोणताही काळाबाजार झालेला नाही.
– प्रकाश भटेवरा, रेशन दुकानदार, राहू.





