पुणे जिल्हा | बेट परिसरात पावसाची ओढ ; दमदार पावसाची प्रतीक्षा कायम

राहू, (वार्ताहर) – सुरुवातीच्या काळात चांगला पडलेला पाऊस आता मात्र रुसलेला आहे. ऑगस्टमध्ये पाऊस झाला पण सप्टेंबरमध्ये मात्र बेट परिसरात त्याने दडी मारली आहे. जरी पिकांना पाणी असले तरी हा पाऊस होणे भविष्याच्या दृष्टीने गरजेचे असते.
कारण भविष्यात विहीर, बोअरवेल किंवा जमिनीत पाणी राहण्यासाठी हा पाऊस गरजेचा आहे.परंतु बेट परिसर त्याला अपवाद ठरला आहे. त्यामुळे राहू बेट परिसरात पावसाची चांगल्या पावसाची अजून देखील प्रतीक्षा आहे.
चालू काळात होणारा पाऊस हा ऊस पिकासाठी पोषक असतो.कारण हा होणारा पाऊस हा गडगडाटासह तसेच विशिष्ट नक्षत्रात होणारा असतो त्यामुळे उसावरील रोगराई नष्ट होते व जोमाने वाढ होते. तसेच या पावसात नत्राचे प्रमाण जास्त प्रमाणात मिळते.
त्यामुळे उसाची वाढ चांगली होते; परंतु पावसाने ओढ दिल्याने उसाच्या उतार्यात निश्चितच कमी येणार असल्याचे बळीराजाचे म्हणणे आहे.
हवामन खात्याने सप्टेंबरमध्ये सरासरी पेक्षा जास्त पाऊसाचा अंदाज सांगितला आहे;परंतु आज निम्मा महिना संपत आला तरी रिमझिम पाऊस पडत आहे. त्यामुळे नेमका कशावर विश्वास ठेवावा हे शेतकर्याला समजेनासे झाले आहे.
बाजरीचे पीक मात्र पदरात
सध्या बाजरीच्या पिकाची कापणी करण्याची शेतकर्याची लगबग चालू आहे. पावसाने उघडीप दिल्यामुळे पीक पदरात पाडण्यासाठी बळीराजा लगबग करत आहे; परंतु पावसाचे जोर केला असता तर शेतकर्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले असते.
यामध्ये बाजरीचे कणसे भिजणे व त्यामुळे बाजरीची प्रत खराब होणे, उत्पादनात घट येणे, या व या सारख्या अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले असते; परंतु पावसाने उघडीप दिल्याने बळीराजा पीक पदरात पाडून घेत आहे.
हुमणीचा प्रादुर्भाव वाढला
सुरुवातीच्या काळात पाऊस पडला ,परंतु नंतर ओढ दिल्याने हुमनीचा प्राधूर्भाव वाढताना दिसून येत आहे.कारण चांगल्या प्रकारे उसाच्या पिकात ओल नसेल तर हुमनीला मूळ कुरताडणे सोपे पडते.व परिणामी मोठ्या प्रमाणे ऊस उलटा पाडून शेतकर्यांचे लाखो रुपयांचे पीक डोळ्या समोर नष्ट होते आहे.





