IPL Schedule : प्रतीक्षा संपली, ‘या’ दिवसापासून सुरू होणार IPL 2025 चा थरार…! BCCI कडून पुढील 2 वर्षांचे वेळापत्रकही जाहीर…

Indian Premier League 2025 Schedule : भारतातीलच नव्हे तर जगभरातील क्रिकेटप्रेमी हे सर्वात मोठ्या क्रिकेट लीगची म्हणजेच आयपीएलची (IPL League) आतुरतेने वाट पाहत असतात. अशातच चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. बॉर्डर-गावस्कर करंडक तसेच चॅम्पियन्स ट्रॉफीची (Champions Trophy 2025) चर्चा आणि आयपीएल 2025 (IPL 2025) मेगा लिलावाची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना आयपीएल 2025 स्पर्धेचे वेळापत्रक समोर आलं आहे.
मेगा ऑक्शन यंदा सौदी अरेबियातील जेद्दाह येथे 23 आणि 24 नोव्हेंबरला पार पडणार आहे. आजकाल IPL 2025 मेगा लिलावाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे, त्याच दरम्यान IPL 2025 ची सुरूवातीची तारीख समोर आली आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, पुढील तीन सीझनच्या तारखा देखील समोर आल्या आहेत. त्यानुसार, आयपीएल 2025 सीझन 14 मार्चपासून सुरू होणार असून आयपीएलचा समारोप 25 मे रोजी होणार आहे. 2026 चा आयपीएल सीझन 15 मार्च ते 31 मे या कालावधीत खेळवला जाणार आहे. तर 2027 या आयपीएल सीझन 14 मार्च ते 30 मे या दरम्यान खेळवला जाणार आहे.
In an unprecedented move, the IPL has released the dates for the next three seasons
The 2025 IPL will start on March 14 with the final on May 25 https://t.co/wmzgIiJdkh
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) November 22, 2024
पुढील सीझनमध्ये सामन्यांची संख्या वाढणार..?
ईएसपीएन क्रिकइन्फोच्या अहवालानुसार, बीसीसीआयकडून सर्व फ्रँचायझींना ई-मेलद्वारे पुढील तीन सीझन सुरु होण्याच्या तारखांची माहिती देण्यात आली आहे. या तारखांना लवकरच अधिकृत पुष्टी दिली जाऊ शकते. गेल्या तीन मोसमाप्रमाणे आयपीएल 2025 च्या मोसमात एकूण 74 सामने खेळवले जाणार आहेत. मात्र, पुढील हंगामात सामन्यांची संख्या वाढविण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
आयपीएल 2026 मध्ये 84 सामने होतील आणि 2027 च्या हंगामात सामन्यांची संख्या वाढून 94 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. सामन्यांच्या संख्येत वाढ होण्याचे कारण मीडिया अधिकार (media rights) असू शकतात. जर आपल्याला आयपीएल 2024 आठवत असेल, तर ही स्पर्धा 22 मार्च ते 26 मे कालावधीत पार पडली , ज्याच्या अंतिम फेरीत KKR ने सनरायझर्स हैदराबादचा पराभव करत विजेतेपद पटकावले.
फ्रँचायझींसाठी आनंदाची बातमी…
आयपीएलच्या सर्व 10 फ्रँचायझींसाठी ही आनंदाची बातमी आहे की, जवळजवळ सर्व पूर्ण आयसीसी सदस्य देशांनी त्यांच्या खेळाडूंना पुढील तीन हंगामांसाठी आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी दिली आहे.
2025 च्या मेगा लिलावापूर्वी बीसीसीआयने नवीन नियमावली जारी केली होती. या अंतर्गत, जर कोणताही परदेशी खेळाडू मेगा लिलावाचा भाग झाला नाही तर तो पुढील दोन हंगाम खेळू शकणार नाही. दुसरीकडे, लिलावात खरेदी केल्यानंतर परदेशी खेळाडूने आपले नाव मागे घेतल्यास त्याला दोन वर्षांच्या बंदीला सामोरे जावे लागण्याची तरतूद आहे.





