Sanju Samson : सीएसकेने नाकारली राजस्थान रॉयल्सची ऑफर! सॅमसनच्या बदल्यात केली होती ‘ही’ मागणी

CSK reject RR Trade offer : राजस्थान रॉयल्सचा (RR) कर्णधार आणि यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसन याने आयपीएल 2026 च्या हंगामापूर्वी संघातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सैमसन चेन्नई सुपर किंग्स (CSK) मध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं, पण आता या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. क्रिकबजच्या वृत्तानुसार, सीएसकेने आरआरने दिलेला ट्रेड प्रस्ताव नाकारला आहे.
आरआरची काय होती मागणी?
राजस्थान रॉयल्सने सॅमसनच्या बदल्यात सीएसकेकडून अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजा, फलंदाज ऋतुराज गायकवाड किंवा शिवम दुबे यापैकी एकाची मागणी केली होती. मात्र, सीएसके व्यवस्थापनाने ही मागणी स्पष्टपणे फेटाळली. सीएसकेने आपल्या कोणत्याही प्रमुख खेळाडूला सोडण्यास तयार नाही. त्यामुळे सॅमसनचा सीएसकेमध्ये जाण्याचा मार्ग सध्या बंद झाला आहे.
तथापि, लांबलचक चर्चेनंतर किंवा नीलामीत सीएसके सॅमसनला विकत घेऊ शकते, पण सॅमसन नीलामीत येईलच याची खात्री नाही. दरम्यान, आरआरने इतर अनेक फ्रॅचायझींशी सॅमसनच्या ट्रेडबाबत गंभीर चर्चा करत आहे. अनेक फ्रॅचायझींनी सॅमसनमध्ये रस दाखवला आहे. आरआरचे मुख्य मालक मनोज बडाले स्वत: या चर्चेची पुढाकार घेत आहेत. आरआरने अनेक फ्रॅचायझींना पत्र लिहून सॅमसनला घेण्याबाबत त्यांची रुची जाणून घेतली आहे.
मात्र, सॅमसन आरआरमध्येच राहण्याची शक्यताही नाकारता येत नाही. कारण खेळाडूला रिलीज किंवा ट्रेड करण्याचा अधिकार केवळ फ्रँचायझीकडेच आहे. खेळाडू फक्त व्यवस्थापनाकडे विनंती करू शकतो. सॅमसनच्या भवितव्यासंदर्भात आगामी काळात काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सॅमसन 2013 मध्ये पहिल्यांदा राजस्थान रॉयल्सशी जोडले गेले आणि 2021 मध्ये त्यांना संघाचे कर्णधारपद देण्यात आले. 30 वर्षीय सॅमसन यांनी 2022 मध्ये राजस्थानला 2008 नंतर प्रथमच आयपीएलच्या अंतिम फेरीत नेले होते.





