शिरवलीत १२ वर्षांचा वनवास संपला! अखेर गजबजलेला बाजार पुन्हा सुरू; सरपंचांच्या निर्णयाचे कौतुक

प्रभात वृत्तसेवा
खालापूर – ग्रामीण भागातील नागरिकांना स्वस्त दरात भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तू उपलब्ध व्हाव्यात, तसेच शेतकरी व छोट्या विक्रेत्यांना थेट विक्रीसाठी हक्काची जागा मिळावी, या उद्देशाने शिरवली गावचा १२ वर्षांपासून बंद असलेला आठवडा बाजार अखेर पुन्हा सुरू झाला. सरपंच महेश पाटील यांच्या पुढाकाराने १९ डिसेंबर रोजी हा बाजार सुरू करण्यात आला असून आता दर शुक्रवारी बाजार भरणार आहे.
या वाजाराच्या उद्घाटनप्रसंगी सरपंच महेश पाटील, ज्येष्ठ नागरिक किसन ढमाल, दत्तात्रय कडव, काशिनाथ पाटील, सामाजिक कार्यकर्ते रवी पाटील, विजय मोरे, नरेश घरत, संदीप पाटील, पी.आर. पाटील, गणेश जाधव, यशवंत ढमाल यांच्यासह विक्रेता वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.सरपंचपदी निवड झाल्यानंतर महेश पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबविण्यास सुरुवात केली असून ग्रामस्थांच्या सहकार्यातून अनेक प्रलंबित कामे मार्गी लागली आहेत.
याच पार्श्वभूमीवर ग्रामस्थ आणि विक्रेत्यांची दीर्घकालीन मागणी लक्षात घेऊन बंद पडलेला आठवडा बाजार सुरू करण्यात आला.या बाजारामुळे लहान विक्रेत्यांना रोजगाराची संधी मिळणार असून, मोलमजुरी करणारे, आदिवासी, कातकरी, ठाकूर समाजातील कुटुंबे आणि महिला वर्गाला घरगुती वस्तू सहज उपलब्ध होणार आहेत. बाजार सुरू झाल्याने गावात आर्थिक उलाढाल वाढेल, तसेच गरीब-गरजू विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे.





