Heatwave alert – गेल्या काही दिवसांपासून तापमानात अचानक वाढ झाल्याने खालापूर तालुक्यात उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच सूर्य आग ओकत असल्याचा भास होत असून विद्यार्थी, पालक, कामगार तसेच वयोवृद्ध नागरिक या कडक उन्हामुळे त्रस्त झाले आहेत. सकाळी दहा वाजल्यापासूनच उन्हाचा तडाखा वाढत असून नागरिकांना घराबाहेर पडताना छत्री, स्कार्फ, गॉगल, टोपी यांचा आधार घ्यावा लागत आहे. वाढत्या तापमानामुळे अंगाची लाही-लाही होत असून अनेकांना घामाच्या धारांसह डोकेदुखी आणि थकवा यांसारखे त्रास जाणवू लागले आहेत. तज्ज्ञांच्या मते, उष्णतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन उष्माघाताचा धोका वाढतो. ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर येणे, डोकेदुखी, रक्तदाब वाढणे तसेच मानसिक अस्वस्थता अशी लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तालुक्यातील बाजारपेठांमध्ये पांढरे कपडे, स्कार्फ, टोपी यांची मागणी वाढली असून नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी विविध उपाययोजना करताना दिसत आहेत. वाढत्या उष्णतेमुळे दैनंदिन कामकाजावरही परिणाम होत असून दुपारच्या वेळेत रस्त्यांवरील वर्दळ कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे