Maval Weather Change : मावळचा ‘गारवा’ हरवला, आता उन्हाचे चटके! पर्यटनाचे नंदनवन ‘हॉट’ का झालंय? जाणून घ्या
Maval Weather Change : जागतिक तापमानवाढ आणि वेगाने होणाऱ्या शहरीकरणाचा मावळ तालुक्याला दणका; एप्रिल-मे महिन्यात उन्हाच्या तीव्रतेने गाठला उच्चांक.

Maval Weather Change – निसर्गसंपन्न डोंगररांगा, खळाळणारे धबधबे आणि वर्षभर जाणवणारा सुखद गारवा, थंड हवेच ठिकाण अशी ओळख असलेल्या मावळ तालुक्याला आता वाढत्या जागतिक तापमानवाढीचे चटके सोसावे लागत आहेत. गेल्या काही वर्षांत मावळच्या वातावरणात कमालीचा बदल झाला असून, उन्हाळा वर्ष दरवर्ष तीव्र होत चालला आहे. यंदा एप्रिल-मे महिन्यांत उन्हाच्या तीव्रतेने उच्चांक गाठला आहे.
या बदलत्या ऋतुचक्राचा सर्वाधिक फटका तालुक्याच्या कृषी अर्थव्यवस्थेला बसत असून बळीराजा संकटात सापडला आहे. एकेकाळी थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मावळात आता दुपारी घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. वेगाने होणारे शहरीकरण, महामार्गालगत झालेली वृक्षतोड आणि डोंगररांगांमध्ये सुरू असलेली बांधकामे यामुळे नैसर्गिक संतुलन बिघडले आहे.
सिमेंट काँक्रीटच्या वाढत्या जंगलामुळे उष्णता शोषली जात असून, रात्रीच्या वेळीही उकाडा कायम राहत आहे. पर्यायाने नागरिकांना आता पंखे, कूलर आणि एसीवर अवलंबून राहावे लागत आहे. वाढत्या उष्णतेमुळे तालुक्यात उष्माघात, त्वचारोग आणि थकवा जाणवण्याचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागात कामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना डिहायड्रेशनचा त्रास होत असून लहान मुले आणि ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
रब्बी आणि उन्हाळी पिकांवर परिणाम
उष्णतेच्या लाटेचा थेट परिणाम रब्बी आणि उन्हाळी पिकांवर झाला आहे. गव्हाचे दाणे बारीक होणे, ऊसाची वाढ खुंटणे आणि भाजीपाल्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढणे अशा समस्या समोर येत आहेत. वाढत्या तापमानामुळे फुलांची गळ होत असल्याने फळबागांचेही नुकसान होत आहे. वाढत्या किडीमुळे औषध फवारणीचा खर्च वाढला असून शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.
वाढत्या उष्णतेमुळे गहू आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान होत आहे. कीड आणि रोगांचे प्रमाण वाढल्याने खर्च वाढला पण हातात उत्पन्न कमी येत आहे. जनावरांच्या दूध उत्पादनातही घट झाली आहे, त्यामुळे शेती करणे आता जिकिरीचे झाले आहे.
“उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने तालुक्यातील अनेक ओढे आणि नाले मुदतीपूर्वीच कोरडे पडले आहेत. भूगर्भातील पाणी पातळी खाली गेल्याने विहिरींनी तळ गाठला आहे. मुबलक पाणी असलेल्या मावळात आता पिकांना पाणी द्यायचे कसे, असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. याचाच परिणाम पशुपालनावरही झाला असून जनावरांना चारा आणि पाणी मिळवणे कठीण झाले आहे.
– सुर्यकांत सोरटे (प्रगतशील शेतकरी, दारूंब्रे)
“सध्याच्या तीव्र उष्णतेमुळे शेतकऱ्यांनी पिकांना पारंपरिक पद्धतीने पाणी न देता ठिबक किंवा तुषार सिंचनाचा वापर करावा. पिकांच्या मुळाशी ओलावा टिकवण्यासाठी आच्छादन (मल्चिंग) करावे. स्वतःच्या आरोग्यासोबतच पिकांचेही उन्हापासून संरक्षण करणे गरजेचे आहे.”
– विकास गोसावी (सहाय्यक कृषि अधिकारी, सोमाटणे)






